corona virus : खासगी रुग्णालयांवर आता भरारी पथकाचा वॉच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 11:06 AM2020-10-06T11:06:58+5:302020-10-06T11:10:23+5:30
corona virus, kolhapurnews,Muncipal Corporation, hospital, bill खासगी रुग्णालयामध्ये दाखल रुग्णांना आकारले जाणारे दर तपासणी करण्यासाठी प्रत्येक खासगी रुग्णालयासाठी स्वतंत्र लेखापरीक्षकांची नियुक्ती केली आहे.
कोल्हापूर : खासगी रुग्णालयामध्ये दाखल रुग्णांना आकारले जाणारे दर तपासणी करण्यासाठी प्रत्येक खासगी रुग्णालयासाठी स्वतंत्र लेखापरीक्षकांची नियुक्ती केली आहे. रुग्णाचे हित डोळ्यांसमोर ठेवून शासनाने घेतलेल्या या निर्णयाची प्रभावी व काटेकोर अंमलबजावणी व संनियंत्रणासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी चार अधिकाऱ्यांच्या भरारी पथकाची नियुक्ती केली आहे.
कोरोनाबाधित रुग्णांना वाजवी दरात उपचार मिळण्यासाठी शासन अधिसूचनेनुसार खासगी रुग्णालयांना विविध उपचारासाठी (कोरोनाबाधित व इतर रुग्ण)आकारावयाचे कमाल दर मर्यादा निश्चित केली आहे. अद्यापही काही खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांकडून निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारण्याबाबत तक्रारी दाखल होत आहेत.
आतापर्यंत महापालिकेच्या नियुक्त केलेल्या लेखापरीक्षककडून तब्बल एक कोटीपेक्षा जास्त बिल कमी केले आहे. गोरगरिबांना योग्य दराने खासगी रुग्णालयात उपचार मिळणे गरजेचे आहे.
यासाठी प्रत्येक खासगी रुग्णालयावर प्रशासनाची करडी नजर असणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सोमवारी भरारी पथकाची नियुक्ती केली.
भरारी पथकातील अधिकारी
अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, सहायक आयुक्त संदीप घार्गे, वरिष्ठ लेखापरीक्षक दीपक कुंभार, परवाना अधीक्षक राम काटकर