corona virus : पदाधिकारी पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा परिषद लॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 10:01 PM2020-07-19T22:01:09+5:302020-07-19T22:05:57+5:30
कोल्हापूर जिल्हा परिषदेत कायम राबता असणारे पदाधिकारीच कोरोनाबाधित आढळल्याने रविवारी सुट्टी असतानाही अख्खी जिल्हा परिषद हादरली. यातून मुख्य कार्यकारी अधिकारीदेखील सुटले नाहीत. त्यांनी सेल्फ क्वारंटाईन होणे पसंद केले, तर त्यांच्या संपर्कातील अन्य कर्मचारीही स्राव देणे आणि क्वारंटाईन होण्यासाठी धावपळ करू लागले.
कोल्हापूर : जिल्हा परिषदेत कायम राबता असणारे पदाधिकारीच कोरोनाबाधित आढळल्याने रविवारी सुट्टी असतानाही अख्खी जिल्हा परिषद हादरली. यातून मुख्य कार्यकारी अधिकारीदेखील सुटले नाहीत. त्यांनी सेल्फ क्वारंटाईन होणे पसंद केले, तर त्यांच्या संपर्कातील अन्य कर्मचारीही स्राव देणे आणि क्वारंटाईन होण्यासाठी धावपळ करू लागले.
जिल्हा परिषदेमध्ये दोन नंबरचे पदाधिकारीपद भूषवणाऱ्या या व्यक्तीचा वैयक्तिक संपर्क मोठा आहे. त्यांची अधिकाऱ्यासह ठेकेदार, कार्यकर्ते, सदस्य यांच्याशी ऊठबस जास्त असते. त्यांना गुरुवारी साधारण ताप आणि सर्दी ही लक्षणे जाणवत होती, तरीही ते बैठका घेण्यात व्यस्त होते. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यासोबतही त्यांनी बराच वेळ बैठक घेतली.
इतर अधिकारी, कर्मचारीही त्यांच्यासोबत होते. शुक्रवारी ते जिल्हा परिषदेत आले नाहीत. शनिवारी सुट्टी असल्याने जिल्हा परिषदेमध्ये ते आले नाहीत. मात्र, शनिवारी त्यांनी स्राव तपासणी करता दिला होता. रविवारी दोघे पती, पत्नी बाधित आढळल्याने जिल्हा परिषद हादरली. सामान्य प्रशासन विभागाकडून त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू करण्यात आला.
पहिल्या टप्प्यात मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी स्वतःला घरीच क्वारंटाईन करून घेतले. पदाधिकारी यांच्या थेट संपर्कातील त्यांचे खासगी सचिव, गाडीचा चालक, शिपाई यांचे स्राव घेण्यात आले, तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आलेल्यांनाही क्वारंटाईन व्हा, असे सांगण्यात आले.
सलग तिसरा धक्का
जिल्हा परिषदेत मागील आठवड्यात ग्राम सडक योजनेतील महिला कोरोनाबाधित सापडली होती. चार दिवसांपूर्वी जिल्हा परिषद सदस्य बाधित आढळले. त्यांनतर हे पदाधिकारी बाधित आढळल्यानंतर जिल्हा परिषदेला सलग तिसरा धक्का बसला आहे.