कोरोनामुळे राज्य नाट्य स्पर्धा रद्द होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:49 AM2020-12-17T04:49:05+5:302020-12-17T04:49:05+5:30
इंदुमती गणेश, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोना संसर्गाची भीती आणि निधीची कमतरता यामुळे राज्य नाट्य स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच ...
इंदुमती गणेश, लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोना संसर्गाची भीती आणि निधीची कमतरता यामुळे राज्य नाट्य स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच ही स्पर्धा रद्दच होण्याची शक्यता आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केवळ मागील वर्षीची अर्धवट राहिलेली हिंदी राज्य नाट्यस्पर्धा पूर्ण करण्यास परवानगी दिली आहे. त्यात आता वर्ष संपायला तीन महिने राहिल्याने स्पर्धा होण्याची शक्यता धूसर आहे.
नाट्यपरंपरा जोपासण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने दरवर्षी राज्य नाट्य स्पर्धेेचे आयोजन केले जाते. हौशी, व्यावसायिक, हिंदी, संस्कृत, संगीत राज्यनाट्य, बालनाट्य अशा वेगवेगळ्या विभागात ही स्पर्धा राज्यातील विविध प्राथमिक केंद्रांवर रंगते नंतर अंतिम स्पर्धा होते. ही स्पर्धा रंगकर्मीसाठी महत्त्वाची असते. यानिमित्ताने अभिनयासह पार्श्वसंगीत, प्रकाश, नेपथ्य अशा बॅकस्टेज आर्टिस्टनादेखील व्यासपीठ मिळते. स्पर्धेत चुरस पाहायला मिळते. रसिकांना दर्जेदार नाटके पाहायला मिळतात.
यंदा मात्र कोरोनामुळे सांस्कृतिक क्षेत्रात अजूनही अनलॉक झालेला नाही. शासनाने नियमांचे बंधून घालून नाट्यगृह सुरू करण्यात परवानगी दिली असली तरी राज्य नाट्यबद्दल निर्णय घेतलेला नाही.
---
पारितोषिक वितरण नाही
गतवर्षीच्या प्राथमिक फेरी व अंतिम स्पर्धेत विजयी ठरलेल्या व विविध गटात पारितोषिक जाहीर झालेल्या संघांना अद्याप पारितोषिक वितरण झालेले नाही, बक्षिसाची रक्कमही संघांनाही मिळालेली नाही. मागील महिन्यात केवळ प्रवासखर्च व निर्मितीखर्च देण्यात आला आहे.
--
वेळ पुढे गेली
स्पर्धेचा अवाका मोठा असल्याने ऑगस्टमध्ये स्पर्धेला सुरुवात होते. एप्रिल ते मार्च या आर्थिक वर्षात मार्चअखेर अंतिम स्पर्धा संपून पारितोषिक वितरण होते. सात महिन्यांचा कालावधी त्यात जातो. आता मोठ्या शैक्षणिक नुकसानीनंतर शाळा महाविद्यालये सुरू होत आहेत. शिवाय स्पर्धेसाठी केवळ तीन महिने राहिल्याने आयोजन आणि संघांची तयारी होणे अवघड आहे.
---
१९ केंद्र साडेसातशे नाटके
राज्यात राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी १९ केंद्रांवर होते. प्रत्येक केंद्रांवर किमान १८ नाटके याप्रमाणे साडेतीनशे नाटके प्राथमिक फेरीत सादर होतात. बालनाट्य स्पर्धेत २०० च्यावर, संगीत राज्य नाट्यमध्ये ५०, संस्कृतची ३५ ते ४०, आणि हिंदी राज्य नाट्यमध्ये किमान ६० प्रवेशिका असतात. यानुसार या विविध विभागातील स्पर्धेत साडेसातशेच्यावर नाटके सादर होतात आणि या चळवळीशी १५ ते २० हजारावर कलावंत आणि तंत्रज्ञ जोडलेले आहेत.
---
इंदुमती गणेश