कोरोनामुळे नागरी बँकांचा नफा घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:43 AM2021-03-13T04:43:37+5:302021-03-13T04:43:37+5:30

रमेश पाटील कोल्हापूर : गेले वर्षभर थैमान घातलेल्या कोरोनाची कोल्हापुरातील नागरी बँकांना काही प्रमाणात झळ बसली असल्याचे ...

Corona will reduce the profits of civic banks | कोरोनामुळे नागरी बँकांचा नफा घटणार

कोरोनामुळे नागरी बँकांचा नफा घटणार

Next

रमेश पाटील

कोल्हापूर : गेले वर्षभर थैमान घातलेल्या कोरोनाची कोल्हापुरातील नागरी बँकांना काही प्रमाणात झळ बसली असल्याचे चित्र आहे. कर्जाची अपेक्षित वसुली न झाल्याने व लॉकडाऊनमुळे नवीन कर्जाला समाधानकारक मागणीच झाली नाही. परिणामी, बँकांच्या दैनंदिन व्यवहारावर परिणाम झाला आहे. त्यामुळे बँकांच्या एनपीएमध्ये वाढ होणार असल्याची चिन्हे असून, त्यांचा नफाही २० ते २५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता बँकिंग वर्तुळातून व्यक्त होत आहे. मात्र, अशाही परिस्थितीत नागरी बँकांच्या ठेवीत वाढ झाली आहे. जिल्ह्यात एकूण ४६ नागरी बँका आहेत.

गतवर्षी मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने लॉकडाऊन केले. यामुळे उद्योगधंदे बंद राहिले, अनेकांचे रोजगार गेले, पगारात कपात झाली. त्यामुळे बँकांनी ज्या लहानमोठ्या उद्योजकांना, व्यापाऱ्यांना, नोकरदारांना कर्जे दिले होती, त्यांच्या कर्जाचे हप्ते येणे बंद झाले. त्यातच रिझर्व्ह बँकेने कर्जाचे हप्ते भरण्यास मुदतवाढ दिल्याने जे नित्यनेमाने हप्ते भरत होते, अशा काही कर्जदारांनी ते भरण्यास टाळाटाळ केली. या सर्वांमुळे बॅंकांची थकबाकी वाढली. गेल्या काही वर्षांपासून कोल्हापुरातील बहुतेक सर्वच नागरी बँका सातत्याने नफ्यात आहेत. त्यांच्या ठेवी वाढत आहेत. नफ्याचे आकडेही वाढत आहेत. यंदा मात्र केवळ कोरोनामुळे त्यांच्या नफ्यावर २० ते २५ टक्क्यांनी परिणाम होण्याची शक्यता आहे.

चौकट:

रिझर्व्ह बँकेने धोरणात्मक निर्णय घ्यावेत...

कोरोनाचा बँकांच्या व्यवहारावर परिणाम झाला आहे. या काळात कर्जाला मागणी झाली नाही. कर्जाची चांगली वसुली होऊ शकली नाही. याचा परिणाम बॅलन्स शीटवर होणार आहे. सुमारे २० ते २५ टक्‍क्‍यांनी नफा घटणार आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने नागरी बँकांच्या एनपीएबाबतीत चांगला धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे.

निपुण कोरे

अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा नागरी बँक असोसिएशन.

चौकट:

नफ्यावर परिणाम होणार...

गेले वर्षभर नागरी बँका कोरोनाच्या सावटाखाली आहेत. त्यामुळे थकबाकी वाढणार असल्याने बँकांच्या नफ्यावर परिणाम होणार आहे.

अनिल नागराळे

मुख्य कार्यकारी अधिकारी, कोल्हापूर जिल्हा नागरी बँक असोसिएशन.

चौकट:

बँकांच्या ठेवीत वाढ...

कोरोनाच्या काळात बँकांचे व्यवहार काही प्रमाणात घटले. थकबाकी वाढली. अशी वस्तुस्थिती एकीकडे असताना दुसरीकडे मात्र नागरी बँकांच्या ठेवीत मात्र सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. बँकांनीही कर्जाला मागणी नसल्याने नंतर ठेवीचे व्याजदर कमी केले. तरीही ठेवीत वाढ झाली.

राष्ट्रीयीकृत व क्सजगी बँकांवरही परिणाम....

कोरोनाचा राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांच्या व्यवहारावरही परिणाम झाला असल्याचे एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मात्र, नेमका परिणाम किती झाला आहे हे ३१ मार्चनंतरच समजेल असेही ते म्हणाले.

आकडेवारीत नागरी बँका...

एकूण बँकांची संख्या - ४६,

ठेवी - ११ हजार २४८ कोटी,

कर्जे - ६९ हजार ९५५ कोटी.

Web Title: Corona will reduce the profits of civic banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.