कोरोनाने पुसले १४७१ महिलांंचे कुंकू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:17 AM2021-06-11T04:17:34+5:302021-06-11T04:17:34+5:30
कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गेल्या पाच महिन्यात १ हजार ४७१ महिलांच्या नशिबी वैधव्य आले आहे. तर ८४७ पुरुष ...
कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गेल्या पाच महिन्यात १ हजार ४७१ महिलांच्या नशिबी वैधव्य आले आहे. तर ८४७ पुरुष विधूर झाले आहेत, महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त असून, यापैकी ६१ ते ७० या वयोगटातील सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यासह २१ ते ५० वयोगटातील मृत्यूचे प्रमाणही वाढले असून, यामुळे बालकांच्या डोक्यावरचे पित्याचे छत्र तर हरवले आहेच; पण महिलेला मानसिक आणि आर्थिक पातळीवरही मोठा संघर्ष करावा लागणार आहे.
जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली, तेव्हापासून जिल्ह्यात रोज सरासरी ३० ते ४५ बाधितांचा मृत्यू होत आहे. मे महिन्यात हा आकडा ६० पर्यंत गेला होता. यामध्ये पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण महिलांपेक्षा जास्त आहे. या दुसऱ्या लाटेत तरुणांनाही मोठ्या प्रमाणात बाधा झाल्याने वयोवृद्धांसोबतच तरुणांच्या मृत्यूचे प्रमाणदेखील जास्त आहे. काही जणांचे नुकतेच लग्न झाले होते, काही जणांना २ ते ६ महिन्यांपर्यंतची बालके आहेत, काही जणांची मुलं ११-१२ वर्षांची आहेत. इतक्या वर्षांचा संसार अर्ध्यावरच मोडल्याने या महिलांना मानसिक आणि आर्थिक पातळीवरदेखील आता संघर्ष करावा लागणार आहे. नोकरी व्यवसायातील महिला असेल, तिला व्यवहार ज्ञान असेल तर थोडा ताण कमी होतो; पण ग्रामीण भागातील आणि विशेषत: अशिक्षित किंवा कमी शिकलेली महिला असेल तर तिला आता पुढे काय करायचे, या विवंचनेने ग्रासले आहे.
---
कोरोनाचे एकूण रुग्ण : १ लाख २८ हजार २९२
बरे झालेल्या रुग्णांची संख्या : १ लाख १२ हजार १८३
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण : १२ हजार ४०
---
काेरोनाने झालेले मृत्यू
वयोगट : पुरुष : महिला
२१ ते ३० : ३५ : ११
३१ ते ४० : १४६ : ५१
४१ ते ५० : २३२ : १०१
५१ ते ६० : ३२५ : १८८
६१ ते ७० : ३९१ : २६७
७१ ते ८० : २५३ : १६३
८१ ते ९० : ८५ : ५६
९१ ते १०० : ४ : १०
----
या आहेत योजना
- राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत ज्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झाले असेल त्या कुटुंबाला एकदाच २० हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते.
- संजय गांधी विधवा पेन्शन योजनेंतर्गत कोणत्याही विधवा महिलेला दर महिन्याला अर्थसहाय्य केले जाते. तिला एक मूल असेल तर ८०० रुपये आणि दोन मुलं असतील तर १००० रुपये दिले जातात.
---
येथे करा अर्ज
विधवा पेन्शन योजनेसाठी महिलांना आपआपल्या भागातील तहसीलदार कार्यालयात अर्ज करावा लागतो. तेथे सर्व कागदपत्रांची छाननी व पाहणी झाल्यानंतर योजना लागू केली जाते.
--