राज्य शासनाच्या वतीने ‘कोरोनामुक्त गाव स्पर्धा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:17 AM2021-06-03T04:17:27+5:302021-06-03T04:17:27+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे व गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावीत, यासाठी राज्य ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे व गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावीत, यासाठी राज्य शासनाच्या वतीने ‘कोरोनामुक्ती गाव स्पर्धा’चे आयोजन केल्याची घोषणा राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी केली. महसूल विभागातील तीन ग्रामपंचायतींचा गौरवही केला जाणार आहे.
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून अनेक गावे हॉटस्पॉट होत आहेत. नागरिकांनी स्वत:हून काळजी घेऊन कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासन पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना गावच्या वेशीवरच कोरोनाला रोखलेल्या गावांचा गौरव केला होता. या उपक्रमास आता अधिक चालना देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेत सहभागी गावांचे विविध २२ निकषांवर गुणांकन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत राज्यातील सर्व गावांनी सहभागी होऊन आपले गाव लवकरात लवकर कोरोनामुक्त करावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.
कोरोनामुक्त गावांना १५ ते ५० लाखांचे बक्षीस
कोरोनामुक्त गाव स्पर्धेत प्रत्येक महसूल विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख रुपये व १५ लाख रुपये याप्रमाणे बक्षीस दिले जाणार. ६ महसुली विभागांत प्रत्येकी तीन या प्रमाणे राज्यात १८ बक्षीसे दिली जाणार असून ५ कोटी ४० लाख रुपये बक्षीसाची रक्कम होत आहे.
कोरोनामुक्त गावांना मिळणार विकासकामे
याशिवाय कोरोनामुक्त गाव स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या ३ ग्रामपंचायतींना लेखाशीर्ष पंचवीस – पंधरा (२५१५) व तीस-चोहोपन (३०५४) या योजनांमध्ये प्राधान्य देऊन यामधून प्रत्येक महसूल विभागात पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख रुपये व १५ लाख रुपये इतक्या निधीची विकासकामे मंजूर केली जाणार.