कोरोनाने बाबा गेले, मेरे पास सिर्फ माँ है..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:19 AM2021-06-04T04:19:35+5:302021-06-04T04:19:35+5:30
कोल्हापूर : वडील खासगी नोकरीत होते, आई गृहिणी. वडिलांनी आम्हाला खूप लाडात वाढवलं. आईला कधी काम करू दिलं नाही, ...
कोल्हापूर : वडील खासगी नोकरीत होते, आई गृहिणी. वडिलांनी आम्हाला खूप लाडात वाढवलं. आईला कधी काम करू दिलं नाही, म्हणायचे तू घर मुलांचं सगळं सांभाळ आता वडिलांचं कोरोनाने निधन झालं. संसाराचा डाव अर्ध्यावरती मोडला... आता त्यांना आईचाच आधार, दुसरीकडे त्या माऊलीला मुलांचा सांभाळ कसा करायचा. आर्थिक आणि मानसिक आधार बनून हा गाडा कसा हाकायचा याची चिंता लागली आहे. वडिलांचे प्रेम, धाक आणि मायेला ही मुलं आता पारखी झाली आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत वयोवृद्धांना मोठा होता आता दुसऱ्या लाटेने मात्र मध्यमवयीन लोकांना वेढले आहे. अगदी ३० ते ४५ वयोगटातील नागरिकांचे या काळात मृत्यू होत आहेत. यामुळे अनेकांचे संसार अर्ध्यावरच मोडले आहेत. या वयातील कर्त्या पुरुषांचे निधन झाल्याने पत्नी, लहान मुलं, आई-वडील असं कुटुंबच रस्त्यावर आले आहे. नोकरी, धंदा, व्यवसाय, शेती कामातून कुटुंबाचा चरितार्थ चालवणाऱ्या वडिलांचे निधन झाल्याने अगदी दोन-चार महिन्यांच्या बालकांपर्यंत १५ ते १६ वर्षांपर्यंतची मुलं वडिलांच्या मायेला पारखी झाली आहेत. अचानक झालेल्या या आघाताने आई खचली आहे. तर आपल्याला आयुष्यभर वडिलांशिवाय जगावं लागणार या विचाराने मुलं सैरभैर झाली आहेत, त्यांच्या मनात विचारांचे काहूर दाटले आहे, दुसरीकडे आईला पतीच्या निधनाचे दु:ख उराशी घेवून आता घर कसं चालवायचं, पुढे काय करायचं याची विवंचना आहे.
---
जिल्ह्यात कोरोनाचे एकूण रुग्ण - १ लाख १७ हजार ७७६
बरे झालेले रुग्ण -९८ हजार २८
सध्या उपचार सुरू असलेले -१५ हजार ९२७
एकूण मृत्यू - ३ हजार ८२१
----
वडील खासगी नोकरीत होते. काही दिवसांपूर्वी त्यांना ताप आल्याचे निमित्त झाले आणि त्यांच्यापाठोपाठ आजोबादेखील कोरोनाने गेले. आता घरात मी आणि आई आहोत. वडिलांनी घरासाठी थोडं कर्ज घेतलं होतं, घराचं काम पण पूर्ण झालं नाही. या काळात शेजारी, नातेवाईकांनी साथ दिली पण आता घर चालवण्यासाठी आई नोकरी शोधत आहे, मी पण कुठेतरी लहान मोठा कामधंदा शोधावा म्हणतोय, पण शिक्षण पूर्ण व्हायचं आहे आणि माझं वयही कमी आहे.
एक मुलगा
--
बाबा आणि आजी एकाचवेळी दवाखान्यात ॲडमिट झाले. वडील डॉक्टर होते तरी त्यांना कोरोनाने हिरावून नेले. दुसऱ्याच दिवशी या धसक्याने आजी गेली. मी आणि भाऊ जुळे आहोत. ११ वर्षांचे. आई अंगणवाडीसेविका म्हणून काम करते. घरातल्या दोन जवळच्या माणसांचे निधन झाले पण कोण मदतीला आले नाही. आमचं भरलेलं घर आता रिकामं झालंय. घर खायला उठतंय, आईसारखी रडत असते. तिला कसा धीर कसा द्यायचा हे कळत नाही.
एक मुलगी
--
पती एमआयडीसीत कामाला होते. सर्दी खोकल्याचं निमित्त झालं. त्यांना ॲडमिट केलं पाठोपाठ सासऱ्यांनाही त्रास सुरू झाला. शेती नाही, घर तेवढं स्वत:चे आहे. पदरात तीन वर्षांची मुलगी आणि ६ महिन्यांचा मुलगा आहे. ते जाऊन आज अकरा दिवस झाले पण अजून ते या जगात नाहीत हे पटेना, आता काय करायचं सगळा अंधारच दिसतोय. त्यांच्याशिवाय मी आणि मुलांनी कसं जगायचं. बाप म्हणजे काय हे कळायच्या आधीच माझी मुलं निराधार झाली.
एक महिला
---
दोन मुलं झाली आई-वडिलांना पारखी
कोरोनाने एका पालकाचे निधन झाले अशी १७५ बालके आहेत, मलकापूर येथील एका कुटुंबातील पती आणि पत्नी दोघांचेही निधन झाल्याने लहान मुलगा आणि मुलगी आई-वडिलांच्या प्रेमाला मुकले आहेत. या भावंडांची जबाबदारी त्यांच्या नातेवाईकांनी घेतली आहे.
---