कोरोनाची तब्बल पावणेतीन कोटींची बिले झाली कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:17 AM2021-07-21T04:17:25+5:302021-07-21T04:17:25+5:30
कोल्हापूर : काेरोनाकाळात भरमसाठ बिले आकारून रुग्णांची लुबाडणूक होऊ नये म्हणून महानगरपालिका प्रशासनाने नियुक्त केलेल्या २७ लेखा परीक्षकांनी केलेल्या ...
कोल्हापूर : काेरोनाकाळात भरमसाठ बिले आकारून रुग्णांची लुबाडणूक होऊ नये म्हणून महानगरपालिका प्रशासनाने नियुक्त केलेल्या २७ लेखा परीक्षकांनी केलेल्या तपासणीतून पावणेतीन कोटींची बिले कमी करण्यात आली. शहरातील ६७ रुग्णालयांनी रुग्णांकडून जादा बिलांची आकारणी केली होती. दरम्यान, कोल्हापूरकरांनी साडेतीन महिन्यांत कोरोनावर मात करण्यासाठी तब्बल ५७ कोटी ०४ लाख ४३ हजार ४०७ रुपयांची रक्कम खर्च केली.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार खाजगी रुग्णालयातील कोरोना रुग्णांच्या बिलांची तपासणी करण्यासाठी महानगरपालिकेने शहरातील ६७ हॉस्पिटल्ससाठी २७ लेखा परीक्षकांची नियुक्ती केली आहे. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पथके शहरात काम करीत आहे. या लेखा परीक्षकांचे कामकाज मुख्य लेखा परीक्षक वर्षा परीट यांच्या नियंत्रणामध्ये सुरू आहे. लेखा परीक्षक शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार रुग्णांच्या बिलांची तपासणी करतात.
शहरात दि. १ एप्रिल ते दि. १९ जुलै २०२१ अखेर महापालिकेच्या लेखा परीक्षकांनी ६७ रुग्णालयांच्या ८२९९ बिलांची तपासणी केली. त्यामध्ये रुग्णालयांनी रुग्णांची ५९ कोटी (59,78,50,554/-) ची बिले केली होती. या बिलांची महापालिकेने नियुक्त केलेल्या लेखा परीक्षकांनी तपासणी करून २ कोटी ७४ लाख,०७ हजार १४७ रुपयांची रक्कम बिलामधून कमी केली. बिलातून कमी केलेली रक्कम संबंधित हॉस्पिटलकडून रुग्णांना परत केली जाते का, याचीही वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाते.
- सूचना देऊनही १४ रुग्णालयांचा नकार -
लेखा परीक्षकांनी रुग्णालयांना जादा घेतलेली रक्कम रुग्णांना परत करण्यास सांगितले होते; पण काही हॉस्पिटल्सनी नकार दिला होता. अशा १४ रुग्णांच्या नातेवाइकांच्या बिलाबाबत लेखा परीक्षकांकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यातील सहा तक्रारी समितीने निकाली काढून संबंधित रुग्णांना डिस्चार्ज झाल्यानंतरही एक लाख ९८ हजार २९३ रुपयांची रक्कम परत मिळवून दिली. अद्याप सात तक्रारी समितीकडे असून, यावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. रुग्णांनी लेखा परीक्षकांकडून तपासणी करून झाल्यानंतरच ती रक्कम रुग्णालयांना अदा करावी, असे आवाहन मुख्य लेखा परीक्षक वर्षा परीट यांनी केले आहे.