कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांचा उपचार खर्च पालिका करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:19 AM2021-05-29T04:19:28+5:302021-05-29T04:19:28+5:30
: अत्याधुनिक गॅस दाहिनीही बसवण्यात येणार मुरगूड : मुरगूड नगरपरिषदेचे आरोग्य कर्मचारी शहराचे आरोग्य चांगले राहावे यासाठी दिवसरात्र सेवा ...
: अत्याधुनिक गॅस दाहिनीही बसवण्यात येणार
मुरगूड : मुरगूड नगरपरिषदेचे आरोग्य कर्मचारी शहराचे आरोग्य चांगले राहावे यासाठी दिवसरात्र सेवा बजावत आहेत. ही आरोग्य सेवा बजावताना कर्मचारी कोरोनाबाधित झाल्यास त्यांचा औषध उपचाराचा खर्च पालिका करणार असल्याचा ठराव शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष राजेखान जमादार होते.
मुरगूड नगरपालिकेची सर्वसाधारण सभा ऑनलाइन झाली. कोरोनाच्या महामारीत स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी गॅस दाहिनीची गरज लक्षात घेता ८० लाखांची दाहिनी स्मशानभूमीत बसविण्याचा ठरावही सर्वानुमते मंजूर करण्यात आला .
पालिकेच्या घंटागाड्या नादुरुस्त झाल्याने त्याची तातडीने दुरुस्ती करून घेणे, पालिकेकडील सर्व वाहनांचे विमा नूतनीकरण करणे, पाटील व ज्ञानेश्वर कॉलनीच्या सुरुवातीस असणाऱ्या पहिले नगराध्यक्ष स्व. विठ्ठलराव तथा बाबाजी हरिभाऊ पाटील यांच्या नावाच्या स्वागत कमानीचे सुशोभीकरण करणे यांना सभेत मान्यता देण्यात आली.
पालिका अग्निशमन विभागाकडे अग्निशमन वाहन खरेदी करण्याचा निर्णयही या सभेत घेण्यात आला.
सभेत आयत्या वेळच्या विषयात रस्ते डांबरीकरण, नवीन सुधारीत पाणी योजना यावर सविस्तर चर्चा झाली. चर्चेत माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, नगरसेवक सुहास खराडे, धनाजी गोधडे, विशाल सूर्यवंशी, पक्षप्रतोद संदीप कलकुटकी, विरोधी पक्षनेता राहुल वंडकर यांनी सहभाग घेतला. सभेस पालिका मुख्याधिकारी हेमंत निकम, प्रकाश पोतदार, अनिकेत सूर्यवंशी, जयवंत गोधडे, रणजित निंबाळकर यांच्यासह सर्व खाते प्रमुख, नगरसेवक -नगरसेविका उपस्थित होते.