CoronaVirus : शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीलाच गोंधळ, शाळेत आलेले शिक्षक परत गेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 05:24 PM2020-06-15T17:24:44+5:302020-06-15T17:26:31+5:30
शिक्षण विभागाच्या पूर्वीच्या सूचनेनुसार शिक्षक हे सोमवारी शाळांमध्ये आले. पण, शाळा बंद ठेवण्याबाबतचा माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश सकाळी साडेअकराच्या सुमारास प्राप्त झाल्याने माध्यमिक शिक्षक हे पुन्हा घरी गेले.
कोल्हापूर : शिक्षण विभागाच्या पूर्वीच्या सूचनेनुसार शिक्षक हे सोमवारी शाळांमध्ये आले. पण, शाळा बंद ठेवण्याबाबतचा माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश सकाळी साडेअकराच्या सुमारास प्राप्त झाल्याने माध्यमिक शिक्षक हे पुन्हा घरी गेले.
प्राथमिक आणि महानगरपालिकेच्या शिक्षकांना मात्र, त्याबाबतच्या आदेशाची दुपारी साडेतीन वाजेपर्यंत प्रतिक्षा करावी लागली. त्यामुळे प्राथमिक, माध्यामिक शाळांतील नवीन शैक्षणिक वर्षाची सुरूवात एकप्रकार गोंधळाने झाली. शहरातील काही शाळांनी नववी, दहावीच्या ऑनलाईन शिक्षणाची सुरूवात केली.
शाळा सुरू करण्यासाठी शासन आणि शिक्षण विभागाची वेगवेगळी भूमिका राहिल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारपासून शाळा सुरू होणार नाहीत. शिक्षकांना वर्क फ्रॉम होमचे आदेश रविवारी रात्री दिले. पण, त्याबाबतचा शिक्षण विभागाकडून लेखी आदेश प्राप्त झाला नसल्याने शिक्षक सोमवारी सकाळी वेळेत शाळेत आले.
त्यावर मुख्याध्यापक संघाने माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर लोहार यांनी शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत शाळा बंद ठेवण्यात याव्यात. चालू शैक्षणिक वर्षात शाळा सुरू करण्याबाबत शासन निर्देश प्राप्त होताच कळविण्यात येईल, या सूचनेचे परिपत्रक सोशल मिडियाव्दारे प्राचार्य, मुख्याध्यापकांना पाठविले.
या परिपत्रकाची माहिती मुख्याध्यापकांनी शिक्षकांना दिली. त्यानंतर ऑनलाईन शिक्षण, नवीन वर्षाचे वेळापत्रक निश्चिती, आदींबाबत चर्चा करून माध्यमिक शिक्षक घरी परतले. त्याची माहिती मिळाल्यानंतर सर्व कोल्हापूर शहर प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीच्या शिष्टमंडळाने शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांची भेट घेवून शासन आदेशाबाबत विचारणा केली. त्यावर शिक्षणाधिकाऱ्यांकडून पुढील आदेश दिले जातील, असे सांगितले. त्यानंतर दुपारी पावणेचार वाजता आदेश मिळाल्यानंतर प्राथमिक शिक्षकही घरी परतले.
शहरातील प्रायव्हेट हायस्कूल, महापालिका शाळा आणि खासगी प्राथमिक शाळांनी ऑनलाईन शिक्षणाची सुरूवात केली. मुख्याध्यापक, क्लार्क आणि काही शिक्षक प्रवेश प्रक्रिया, पुस्तक वितरणासाठी शाळेत थांबून होते.