CoronaVirus : कोरोना योध्द्यांच्या संरक्षणासाठी कोल्हापूरात फेसशिल्डची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 06:13 PM2020-06-10T18:13:39+5:302020-06-10T18:19:45+5:30
भीतीचे वातावरणात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव वाढत असल्यामुळे सुरक्षेसाठी विविध मास्क आणि सॅनिटायझरचा वापर सुरु झाला. मास्कमुळे केवळ नाक आणि तोंडाची सुरक्षा होत असल्यामुळे डोळे आणि कानाची काळजी घेणाऱ्या फेसशिल्डची निर्मिती कोल्हापूरातील आदित्य माने यांनी थ्रीडी प्रिंटरच्या सहाय्याने अॅबस्ट्रॅक्ट मटेरियल लॅबमार्फत केली आहे. या फेसशिल्डला कोरोना योध्द्यांकडून प्रतिसाद मिळत आहे.
कोल्हापूर : भीतीचे वातावरणात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव वाढत असल्यामुळे सुरक्षेसाठी विविध मास्क आणि सॅनिटायझरचा वापर सुरु झाला. मास्कमुळे केवळ नाक आणि तोंडाची सुरक्षा होत असल्यामुळे डोळे आणि कानाची काळजी घेणाऱ्या फेसशिल्डची निर्मिती कोल्हापूरातील आदित्य माने यांनी थ्रीडी प्रिंटरच्या सहाय्याने अॅबस्ट्रॅक्ट मटेरियल लॅबमार्फत केली आहे. या फेसशिल्डला कोरोना योध्द्यांकडून प्रतिसाद मिळत आहे.
२४ मार्च रोजी पहिल्या लॉकडाउनची घोषणा झाली आणि जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. लॉकडाउनच्या काळात जनतेला अत्यावश्यक सेवा पुरविणे आणि त्या सेवा पुरविणाऱ्या व्यक्तीला कोरोना संक्रमणापासून संरक्षण करणे अशी दुहेरी कसरत प्रशासनाला करावी लागू लागली. एन ९५ आणि पीपीई किटसचा तुटवडा असताना या संकटाचा सामना करणे यासाठी कोल्हापूरातील अॅबस्ट्रॅक्ट मटेरियल लॅबने थ्रीडी प्रिंटरच्या सहाय्याने फेसशिल्डचे डिझाईन तयार केले.
लॅबने तयार केलेल्या या विशिष्टप्रकारच्या फेसशिल्डमुळे नाक आणि तोंडासह डोळे आणि कानाचेही संरक्षण होते. हे लक्षात आल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार हे फेसशिल्ड एन ९५ च्या मास्कला चांगला पर्याय ठरणार याची खात्री पटली. यामुळे नाक, तोंड, कान आणि डोळ्यांचेही कोरोना विषाणूपासून संरक्षण पुरविणारे ठरते, यामुळे प्रशासनाने २000 फेस शिल्डची मागणी केली आणि लॅबने तत्काळ पुरविली.
यासाठी लॅबला पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महानगरपालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, केआयटी कॉलेजने सहकार्य केले आहे.
कमीत कमी वेळेत निर्मिती
कमीत कमी वेळेत आणि जास्तीत जास्त फेसशिल्ड पुरविण्याचे काम थ्रीडी प्रिंटरमुळे शक्य झाले. अवघ्या आठ दिवसांत लॅबने २000 फेस शिल्डची मागणी तत्काळ पुरविली. फेसशिल्डची निर्मिती केल्याने प्रशासनावरील ताण बराचसा कमी होण्यास मदत झाली. यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली.
शासकीय आणि अशासकीय कार्यालये, खासगी संस्था यांच्या प्रोत्साहनामुळे फेसशिल्डची यशस्वी निर्मिती झाली. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, सीपीआर, खासगी रुग्णालय, कोल्हापूर अनॅस्थॅशिएस्टसारख्या खासगी संस्था, डॉक्टर्स, पारिचारिका, अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या व्यक्ती, लहान मुले, गर्भवती महिला, वृध्द व्यक्ती यांना या फेसशिल्डचा मोठा फायदा होत आहे.
- आदित्य माने,
अॅबस्ट्रॅक्ट मटेरियल लॅब, कोल्हापूर.