Coronavirus : कोरोनामुळे वस्त्रोद्योगाची चेनही ब्लॉक! बाहेरची बाजारपेठ सुरू नसल्याने अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 06:58 AM2020-05-14T06:58:48+5:302020-05-14T06:59:54+5:30
‘कापूस ते कापड ते गारमेंट’ अशा चेनमधील प्रत्येक टप्प्यांवर वेगवेगळ्या अडचणी समोर येत आहेत. त्यातच बाहेरची बाजारपेठ पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने अडचणींमध्ये वाढ होत आहे. परिणामी वस्त्रोद्योगात अद्याप अस्थिरता आहे.
- अतुल आंबी
इचलकरंजी (जि.कोल्हापूर) : वस्त्रोद्योगातील सर्व घटक एकमेकाला पूरक असतात. कोरोनाची चेन ब्लॉक करण्याच्या प्रयत्नात वस्त्रोद्योगाची चेनही ब्लॉक झाली आहे. ‘कापूस ते कापड ते गारमेंट’ अशा चेनमधील प्रत्येक टप्प्यांवर वेगवेगळ्या अडचणी समोर येत आहेत. त्यातच बाहेरची बाजारपेठ पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने अडचणींमध्ये वाढ होत आहे. परिणामी वस्त्रोद्योगात अद्याप अस्थिरता आहे.
वस्त्रोद्योग सुरू करण्यासाठी परवानगी मिळाल्यानंतर सूतगिरण्यांपासून सायझिंग, वार्पिंग, विव्हींग (यंत्रमाग), प्रोसेसर्स, गारमेंटपर्यंतच्या चेनमधील सर्व स्थानिक घटकांनी आपापल्या पद्धतीने व्यवसाय सुरू करण्यासाठी धडपड केली. शहरातील व्यावसायिकांकडे उपलब्ध कच्च्या मालावर सध्या कारखाने सुरू आहेत.
इचलकरंजीत दक्षिण भारतातील तमिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा तसेच महाराष्टÑ आणि पंजाब, अहमदाबाद (गुजरात) येथून सूत येते. त्यातील काही ठिकाणच्या सूतगिरण्या सुरू झाल्या आहेत. किरकोळ मागणीही आहे. त्यानुसार सूत मिळत आहे; परंतु पुढे मागणी नसल्याने उत्पादन थांबत आहे. शहरात तयार झालेले कापड अहमदाबाद, कोलकाता, दिल्ली, पाली-बालोत्रा, मुंबई, आदी ठिकाणी पाठविले जाते.
नवीन संधीचे सोने
रुमाल, नॅपकिन, मास्क, पीपीई किट निर्माण करणारे गारमेंट सुरू आहेत. त्यामुळे त्यासाठी कापड उत्पादन करणारे कारखाने सुरू आहेत. त्यासाठी लागणारे बिम सायझिंग करून घेतले जात आहेत.
कामगारांची टंचाई
वस्त्रोद्योगातील अनेक घटकांत काम करणारे परप्रांतीय कामगार परत गेल्यानेही काही कारखान्यांमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. अडकलेला माल काढून घेण्यासाठीही त्यांना कामगार मिळेनात, अशी परिस्थिती आहे.
परराज्यांतील प्रोसेसिंग बंद
शहरात तयार होणाऱ्या अनेक चांगल्या क्वॉलिटीचे कापड प्रोसेस करण्यासाठी अहमदाबाद, पाली-बालोत्रा, आदी ठिकाणी परराज्यांत जाते; परंतु तेथील कामकाज ठप्प असल्याने प्रोसेसिंगची प्रक्रिया सध्या बंद आहे.