coronavirus : कोल्हापुरात कोरोना संशयिताचे रुग्णालयातून पलायन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 08:06 AM2020-03-24T08:06:57+5:302020-03-24T08:08:01+5:30
कोरोनाचे संशयित रुग्ण हे रुग्णालयातून पलायन करून डॉक्टर आणि शासनाची चिंता वाढवत आहेत.
कोल्हापूर - एकीकडे देश आणि राज्यावर ओढवलेले कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. तर दुसरीकडे कोरोनाचे संशयित रुग्ण हे रुग्णालयातून पलायन करून डॉक्टर आणि शासनाची चिंता वाढवत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार कोल्हापूरमध्ये समोर आला आहे. कोल्हापुरात कोरोनाचा संशय असलेल्या एका रुग्णाने रुग्णालयातून पलायन केले आहे.
कोरोनाचा संशय असलेला हा रुग्ण छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातून पसार झाला आहे. हा 28 वर्षिय कोरोनाचा संशयित रुग्ण दुबईहून भारतात परतला होता. दरम्यान, तो आपली कागदपत्रे घेऊन रुग्णालयात आला. मात्र जरा बाहेर जाऊन येतो, असे सांगून तो रुग्णालयतून पसार झाला.
दरम्यान, असाच प्रकार नागपूरमधून समोर आला आहे. नागपुरात होम कोरेंटाईन केलेली संशयित कोरोना बाधित महिला उत्तर प्रदेशात पळून गेल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे, त्यामुळे सर्वत्र प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
सूत्रांच्या माहिती नुसार, 35 वर्षीय ही महिला सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते, तिचे माहेर उत्तर प्रदेश मध्ये आहे. ती 15 मार्चला शारजाह येथून नागपुरात परत आली होती.
तिला होम कोरेनटाईन करण्यात आले होते. घराबाहेर पडायचे नाही, कुणाच्या संपर्कात यायचे नाही, अशी स्पष्ट ताकीद वजा सूचना या महिलेला देण्यात आली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून,सगळ्यांना चुकवुन ही महिला घरून निघून गेल्याचे सोमवारी पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे पोलीस प्रशासन -जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी तिची सर्वत्र शोधाशोध केली. नातेवाईकांकडे विचारणा केली असता ही महिला उत्तर प्रदेशात निघून गेल्याचे स्पष्ट झाले. उत्तर प्रदेशात या महिलेचे माहेर असल्याचीही माहिती पुढे आली.