Coronavirus : इचलकरंजीतील कापडी मास्कला मागणी वाढली; व्यावसायिकांना मिळाले काम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 07:29 AM2020-03-20T07:29:31+5:302020-03-20T07:29:43+5:30
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर युज अॅण्ड थ्रो, नॉनओव्हन मास्कऐवजी कापडी मास्कची चांगलीच मागणी वाढली आहे. सर्वाधिक मागणी पुण्यातून होत असली तरी मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणांहूनही इचलकरंजीत ऑर्डर देऊन मास्क बनवून घेतले जात आहेत.
- अतुल आंबी
इचलकरंजी - कोरोना व्हायरसचा येथील वस्त्रोद्योगातील अन्य उत्पादनाला फटका बसला असला तरी कापडी मास्क व यासाठी वापरल्या जाणाऱ्या कापड उत्पादनास मोठी मागणी आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व मुंबईतून जवळपास सव्वा कोटी मास्कची आॅर्डर शहरातील ५० ते ७० गारमेंट व्यावसायिकांना मिळाली आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर युज अॅण्ड थ्रो, नॉनओव्हन मास्कऐवजी कापडी मास्कची चांगलीच मागणी वाढली आहे. सर्वाधिक मागणी पुण्यातून होत असली तरी मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणांहूनही इचलकरंजीत आॅर्डर देऊन मास्क बनवून घेतले जात आहेत.
इचलकरंजी आणि माधवनगर येथे तयार होणाºया अशा मास्कची घाऊक किंमत केवळ १० व १५ रुपये आहे. किरकोळ बाजारामध्ये सध्या १२ रुपयांपासून ते २०-२५ रुपयांपर्यंत या मास्कची विक्री केली जात आहे.
शहरातील विविध गारमेंटमध्ये सध्या मास्क बनविण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्या अनुषंगाने इलॅस्टिकचीही मागणी वाढली असून दररोज तीन ते पाच लाख रुपयांचे इलॅस्टिक यासाठी लागत आहे. ५० गारमेंटमधून दररोज किमान चार ते सहा लाख मास्क तयार करून बाहेर पाठविले जात आहेत.
संस्थांकडूनही मागणी
बाजारामध्ये सध्या अनेक प्रकारचे मास्क मिळत असले तरी कापडी मास्कची मागणी जास्त आहे.
विविध शहरांतील सामाजिक संघटनांकडूनही
२५ हजारांपासून ते एक लाखापर्यंतच्या मास्कच्या आॅर्डर मिळत आहेत.