CoronaVirus : कोरोनासाठी जिल्हा परिषदेला २१ कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 02:17 PM2020-06-11T14:17:45+5:302020-06-11T14:18:49+5:30
कोरोनाविरोधातील लढाईसाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातून कोल्हापूर जिल्ह्यासाठी २१ कोटी ३५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यातील १५ कोटी ४५ लाख रुपये प्रत्यक्षात मिळाले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या मासिक सभेत देण्यात आली. अध्यक्षस्थानी सभापती हंबीरराव पाटील होते.
कोल्हापूर - कोरोनाविरोधातील लढाईसाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातून कोल्हापूर जिल्ह्यासाठी २१ कोटी ३५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यातील १५ कोटी ४५ लाख रुपये प्रत्यक्षात मिळाले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या मासिक सभेत देण्यात आली. अध्यक्षस्थानी सभापती हंबीरराव पाटील होते.
सभापती पाटील म्हणाले, मुंबई आणि पुण्यासह बाधित क्षेत्रातून येणाऱ्या सर्व नागरिकांचे स्राव घेतले जावेत. जेणेकरून ग्रामीण भागात पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढणार नाही. जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण आढळत असून याबाबतही दक्षता घ्या. पनोरी आणि आसनगाव ही राधानगरी तालुक्यातील दोन आरोग्य उपकेंद्रे राज्य शासनाची असून तेथे कर्मचारी मात्र जिल्हा परिषदेचे आहेत. तेव्हा ही दोन्ही केंद्रे जिल्हा परिषदेकडे घ्यावीत, असे पत्र सदस्या सविता भाटळे यांनी दिले आहे.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातून आलेल्या रकमेबरोबरच जिल्हा नियोजन समितीमधून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला पाच कोटी २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याचे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे यांनी सांगितले. यावेळी सदस्या शिल्पा पाटील, रेश्मा देसाई, मनीषा टोणपे, सुनीता रेडेकर, पुष्पा आळतेकर, शाहूवाडीच्या सभापती सुनीता पारळे उपस्थित होत्या.
कोरोनाचा खर्च १३ कोटी ५५ लाख
कोरोनाच्या काळामध्ये किती खर्च झाला अशी विचारणा यावेळी करण्यात आली. यावेळी मास्क, व्हीटीएम किटस्, पीपीई किटस्, सॅनिटायझर यांसह अन्य साहित्यावर ११ कोटी ३० लाख तर व्हेंटिलेटर, थर्मल स्कॅनर यांसह उपकरणांच्या खरेदीसाठी सव्वादोन कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात आले.