CoronaVirus : कचरा कंटेनरचे परिसर स्वच्छ व सुशोभित करावेत : महापौर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 11:00 AM2020-06-09T11:00:39+5:302020-06-09T11:01:50+5:30
कंटेनरसभोवती कचरा टाकण्यात येत असल्यामुळे शहरात ३० ते ३५ डर्टी स्पॉट तयार झाले असून, आणखीन काही डर्टी स्पॉट असतील तर त्याची यादी तयार करून त्या ठिकाणची त्वरित स्वच्छता करावी, अशा सूचना महापौर निलोफर आजरेकर व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सोमवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. महापालिकेच्या खुल्या जागेवर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
कोल्हापूर : कंटेनरसभोवती कचरा टाकण्यात येत असल्यामुळे शहरात ३० ते ३५ डर्टी स्पॉट तयार झाले असून, आणखीन काही डर्टी स्पॉट असतील तर त्याची यादी तयार करून त्या ठिकाणची त्वरित स्वच्छता करावी, अशा सूचना महापौर निलोफर आजरेकर व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सोमवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. महापालिकेच्या खुल्या जागेवर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
शहरातील डर्टी स्पॉट सुशोभीकरण करण्यासाठी महापौर आजरेकर यांनी बैठक घेतली. कंटेनर सभोवतालच्या परिसरात झाडांच्या कुंड्या ठेवण्यात याव्यात. कंटेनरजवळील भिंतीवर स्वच्छ भारत अभियानाचे लोगो, प्रबोधनपर चित्रे रेखाटण्यात यावीत. नागरिकांमध्ये प्रबोधन करण्यात यावे. सेवाभावी संस्थांना संपर्क करून त्याठिकाणचा परिसर लोकसहभागातून सुशोभीकरण करण्यात यावा. डेंग्यू प्रतिबंधासाठी चॅनेल व नाले सफाई, स्वच्छतागृहांची सफाई दैनंदिन करण्यात यावी, अशा सूचना महापौरांनी केल्या.
नागरिकांनी आपला कचरा घरातच साठवून ठेवून घंटागाडी आल्यावर कर्मचाऱ्यांकडे द्यावा, असे आवाहन करतानाच मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांनी, जर कचरा कंटेनरच्या बाहेर टाकला तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.
सहायक आयुक्त चेतन कोंडे यांनी भाजी मार्केटमधील कचरा भाजी विक्रेत्यांना साठवून ठेवण्यास सांगू, पण जे कचरा साठवून ठेवत नसतील तर भाजी विक्रेत्यावर कारवाई केली जाईल, असे सांगितले. यावेळी नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील, उपशहर अभियंता रमेश मस्कर, हर्षिजत घाटगे उपस्थित होते