CoronaVirus : दोन महिन्यांनंतर कपिलतीर्थ मार्केट सुरू: उर्वरित टप्प्या-टप्प्याने सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 05:53 PM2020-05-26T17:53:55+5:302020-05-26T17:56:09+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे तब्बल दोन महिने कोल्हापूर शहरातील भाजी मंडई बंद आहेत. मात्र, पावसाळा जवळ आल्याने रस्त्यावरील भाजी मंडई अडचणीच्या ठरू शकतात, म्हणून कपिलतीर्थ मार्केट सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे तब्बल दोन महिने कोल्हापूर शहरातील भाजी मंडई बंद आहेत. मात्र, पावसाळा जवळ आल्याने रस्त्यावरील भाजी मंडई अडचणीच्या ठरू शकतात, म्हणून कपिलतीर्थ मार्केट सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
कोरोनाह्णचा संसर्ग वाढू नये, म्हणून सर्व गर्दीची ठिकाणी बंद करण्यात आली आहेत. आठवडी बाजारासह शहरातील भाजी मंडईमध्ये मोठी गर्दी असते. येथे संसर्गाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, त्यामुळेच लॉकडाऊनपूर्वीच भाजी मंडई बंद करण्यात आल्या आहेत.
भाजीपाला हा जीवनाश्यक वस्तू असल्याने त्याची खरेदी-विक्रीची प्रक्रिया सुरू राहिली. मात्र, आठवडी बाजार अथवा भाजी मंडईमध्ये न करता रस्त्यावर सामाजिक अंतर पाळून खरेदी-विक्री सुरू आहे. कोल्हापूर शहरातील दुकानांसह इतर व्यवहार सध्या विहीत वेळेत सुरू आहेत. त्यात पावसाळा तोंडावर आल्याने रस्त्याच्या कडेला उघड्यावर भाजीपाला विक्री करणे तसे अडचणीचे ठरणार आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने कोल्हापूर शहरातील भाजी मंडई टप्प्या-टप्प्याने सुरू केल्या जाणार आहेत. त्याची सुरुवात सोमवारी कपिलतीर्थ मार्केटपासून झाली.
कपिलतीर्थ मार्केट सुरू झाले मात्र विक्रेते फारच कमी होते. गेली दोन महिने मंडई बंद असल्याने भाजीपाला नाही, त्यात सोमवारी रमजान ईदमुळे कोल्हापूर बाजार समितीमधील भाजीपाल्याचे सौदे बंद राहिले. त्यामुळे सोमवारी कपिलतीर्थ मार्केट सुरू झाले मात्र दोन-चार विक्रेतेच आले होते. त्यांच्याकडेही मोजक्याच भाज्या दिसत होत्या.
आठवडी बाजार सुरू कधी होणार?
आजूबाजूच्या आठ-दहा गावांच्या सोयीसाठी मोठ्या गावांत आठवडी बाजार भरविले जातात. जिल्हा प्रशासनाच्या मान्यतेने हे बाजार कार्यरत असले तरी गेली दोन महिने ते बंद आहेत. शहरातील भाजी मंडई सुरू झाल्याने आठवडी बाजारही सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.
कोल्हापूर शहरातील सर्व व्यवहार अटीस अधीन राहून सुरू आहेत. त्यानुसार भाजी मंडईही टप्प्या-टप्प्याने सुरू करण्याचा प्रयत्न असून कपिलतीर्थ मंडई सुरू केली.
- मल्लिनाथ कलशेट्टी,
आयुक्त, मनपा कोल्हापूर