CoronaVirus : स्वत: सुरक्षित राहा, गावाला सुरक्षित ठेवा, जिल्हाधिकाऱ्यांचा कानमंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 05:54 PM2020-05-30T17:54:01+5:302020-05-30T17:55:36+5:30
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या या टप्प्यावर सामाजिक संसर्ग आणि मृत्यू रोखण्यासाठी ग्रामसमित्यांची सतर्कता खूप महत्वाची आहे. या पार्श्वभूमीवर स्वत: सुरक्षित राहा, गावालाही सुरक्षित ठेवा, आपत्तीला पळवून लावा असा कानमंत्र स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी यांना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवारी दिला.
कोल्हापूर: कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या या टप्प्यावर सामाजिक संसर्ग आणि मृत्यू रोखण्यासाठी ग्रामसमित्यांची सतर्कता खूप महत्वाची आहे. या पार्श्वभूमीवर स्वत: सुरक्षित राहा, गावालाही सुरक्षित ठेवा, आपत्तीला पळवून लावा असा कानमंत्र स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी यांना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवारी दिला.
कोरोना बाधीतांचा आकडा ५५० च्या पुढे गेल्याने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक घेऊन गावचे सरपंच, आशा कर्मचारी, ग्रामसमिती सदस्य, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, कोतवाल, ग्रामसेव, तलाठी, ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी, मंडल अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी यांच्याशी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारा संवाद साधून त्यांना आश्वस्थ केले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महापालिका आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा आरोग्य आधिकारी डॉ. योगेश साळे यांनीही मार्गदर्शन केले.
जिल्हाधिकारी म्हणाले, आतापर्यंत चांगल्याप्रकारे परिस्थिती हाताळल्याने त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. निगेटीव्ह अहवाल घेऊन येणाऱ्या व्यक्तीलाही क्वारंन्टाईन करा, त्यांना बाहेर फिरु देऊ नका. बाहेरुन येणाऱ्यांना सक्तीने अलगीकरण करा. क्वारन्टाईनमधील व्यक्तींची दररोज एमपीडब्ल्यू, एएनएम, आशा, अंगणवाडी सेविका, खासगी, शासकीय डॉक्टर, यांच्यामार्फत वैद्यकीय तपासणी करा. लक्षणे आढळल्यास सीपीआर, डी.वाय.पाटील हॉस्पीटल अथवा कोव्हीड रुग्णालयात दाखल करा.
मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले, बाहेरुन येणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने नियमांचे पालन करणाऱ्यांनाच घरी अलगीकरणात ठेवा, अन्यथा स्वॅब घेऊन त्यांना संस्थात्मक अलगीकरण करा. आयुषचे सर्वेक्षण पूर्ण करुन ५० वर्षापुढील व क्वारन्टाईन व्यक्तींना संजीवनी वटी, आर्सेनिक अल्बम ३० औषधे द्या. कोरोनाबरोबरच डेंग्यू, उष्माघात, स्वाईनफ्लूची काळजी घ्या. क्वारन्टाईन कक्षात पाण्याची सोय करा, डासप्रतीबंध फवारणी करा.
जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणाले, खडतर कालावधी सुरु झाला असून खासगी डॉक्टरांनीही वैद्यकीय कामासाठी हातभार लावावा. बाहेरुन येणाऱ्या, बाधीत व्यक्तींना ग्रामसमितीच्या परवानगीनेच गृह की संस्थात्मक अलगीकरण यांचा निर्णय घ्यावयाचा आहे. आशा, सेविकांनाी काटेकोर सर्वेक्षण केल्यास रुग्ण शोधणे सोपे होणार आहे.
चालकांना क्वारन्टाईनच
मालवाहतूक दूध वाहतूक टँकरचालकांना गावामध्येच स्वतंत्र राहण्याची व्यवस्था करा. त्यांना तशी कल्पना द्या. परजिल्ह्यातून प्रवास करुन येणाऱ्यांचा कुटूंब अथवा गावातील लोकांशी संपर्क टाळा, अशा सुचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या.
दारात साबण, पाणी ठेवा
कोरोनाचा विषाणू साबण आणि सॅनिटायझरलाच घाबरतो, त्यामुळे घरात येताना साबणाने हातपाय धुवूनच यावे, सॅनीटायझरही वापरावे. पुर्वी दारात पाणी ठेवले जाई, आत तसेच करण्याची वेळ आली आहे. याचे तंतोतन पालन करा, अशा सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.