Coronavirus: शिंकलास का?; गाडीवरुन जाणाऱ्या तरुणाला दाम्पत्याने केली मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 01:17 PM2020-03-19T13:17:33+5:302020-03-19T14:08:27+5:30
भारतात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. 122 भारतीयांना आणि 25 परदेशी व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली होती.
कोल्हापूर: चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसचा फटका महाराष्ट्रालाही बसला आहे. मुंबईमध्ये 22 वर्षांची तरुणी कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. ती युरोपमधून भारतात दाखल झाली होती. तर दुसरी पॉझिटिव्ह महिला 49 वर्षांची असून उल्हासनगरची आहे. ही महिला दुबईवरून भारतात आली होती.
अहमदनगरमध्ये देखील एका रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यामुळे आता राज्यात कोरोनाची लागणं झालेल्या रुग्णांची संख्या 49 वर पोहचली आहे. कोरोनामुळे राज्यभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच एखादी व्यक्ती खोकताना किंवा शिंकताना दिसल्यास त्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरात शिंकल्यावरुन एका दुचाकीस्वाराला दाम्पत्याने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
कोल्हापुरात दुचाकीवरुन जाताना संबंधित तरुणाला अचानक शिंका आली आणि त्याने तोंडावर मास्क देखील लावला नव्हता. त्यामुळे संबंधित तरुणाच्या बाजूने जाणाऱ्या एक दाम्पत्याने शिंकलास का असा प्रश्न विचारला. तसेच तोंडावर मास्क लावण्याचा सल्लाही दाम्पत्याने तरुणावा दिला. परंतु मी मास्क लावणार नाही असं सांगितल्याने तरुण आणि दाम्पत्यामध्ये वाद झाला. यानंतर दाम्पत्याने दुचाकीस्वाराला बेदम मारहाण केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तसेच सरकारकडून कोरोनाला रोखण्यासाठी काळजी घ्या, भांडण करु नका असे आवाहन करण्यात येत आहे.
भारतात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. 122 भारतीयांना आणि 25 परदेशी व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने बुधवारी दिली होती. त्यानंतर आता गुरुवारी (19 मार्च) 146 भारतीयांना आणि 25 परदेशी व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आतापर्यंत दिल्लीमध्ये एक, कर्नाटकात एक आणि महाराष्ट्रात एक अशा एकूण 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आंध्र प्रदेश, उत्तराखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये 1, दिल्लीमध्ये 11, हरियाणामध्ये 16, कर्नाटकात 13, केरळमध्ये 27, महाराष्ट्रात 49, पंजाबमध्ये 3, तेलंगणामध्ये 12, राजस्थान 7, उत्तर प्रदेशमध्ये 17, लडाख 8, तमिळनाडू 2, जम्मू-काश्मीर 4 व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.