CoronaVirus Lockdown :रियाज, वाचन, लेखन, नृत्याराधना-विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा दिनक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 02:16 PM2020-04-04T14:16:27+5:302020-04-04T14:20:41+5:30
कोरोनातील संचारबंदीमुळे वेगाने हातून निसटत जाणाऱ्या आयुष्याला अचानक ब्रेक लागला. धावताना अनेक गोष्टी करायच्या राहून जातात; पण या सक्तीच्या विश्रांतीने सर्वांचाच चाकोरीबद्ध दिनक्रम बदलला... अभिनेते, संगीत, गायन, वादन, नृत्य, साहित्य अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांनीही या फावल्या वेळेचा उपयोग आपले छंद पूर्ण करण्यासाठी केला आहे.
इंदुमती गणेश
कोल्हापूर : कोरोनातील संचारबंदीमुळे वेगाने हातून निसटत जाणाऱ्या आयुष्याला अचानक ब्रेक लागला. धावताना अनेक गोष्टी करायच्या राहून जातात; पण या सक्तीच्या विश्रांतीने सर्वांचाच चाकोरीबद्ध दिनक्रम बदलला... अभिनेते, संगीत, गायन, वादन, नृत्य, साहित्य अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांनीही या फावल्या वेळेचा उपयोग आपले छंद पूर्ण करण्यासाठी केला आहे.
सर्वसामान्य दैनंदिन जीवनात एरवी सगळ्यांनाच घराबाहेर पडून आपापल्या कामधंद्यांत लक्ष घालावे लागत असल्याने काही गोष्टी करायच्या इच्छा राहून जातात. छंद मागे पडत जातात; पण सध्या कोरोनामुळे सगळ्यांनाच सक्तीने घरी बसावे लागल्याने आता वेळच वेळ आहे. या वेळेचा सदुपयोग करीत अनेकांनी आपला दिनक्रम बदलला आहे. नियोजनामधील सगळ्या गोष्टी, इच्छा आणि छंद पूर्ण करून घेतले जात आहेत. अशाच विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा संचारबंदीच्या काळातील दिनक्रमाचा घेतलेला हा आढावा.
संगीतात रममाण होतो... : विनोद डिग्रजकर
संचारबंदीमुळे संगीताचा रियाज करायला आता वेळच वेळ मिळाला आहे. सकाळी प्रसन्न शांतता मिळते. त्यावेळी ओंकार साधना, श्वसन आणि आवाजाचे व्यायाम करतो. कुटुंबीयांसोबत चहा-नाष्टा झाला की, वेगवेगळे राग, बंदिशी, पंडितजींच्या रचना यांचा रियाज करतो. संग्रहातील बंदिशी ऐकतो. सध्या बाहेर पडायलाही बंदी असल्याने मुलांना शिकविताही येत नाही; त्यामुळे सगळा वेळ मी संगीतासाठी आणि त्यातच रममाण होतो.
- पं. विनोद डिग्रजकर, शास्त्रीय गायक
स्वत:ला सोबत
काही दिवसांपूर्वीपर्यंत मी एकाच वेळी दोन मालिकांचे चित्रीकरण करीत होतो; त्यामुळे अजिबात वेळ नव्हता. आता मात्र कोल्हापुरातच ही सक्तीची सुट्टी चित्रपट पाहणे, वाचन, स्क्रीन प्ले, शॉर्ट फिल्मचे लेखन यांत घालवीत आहे. घरातली कामे मी, पत्नी, मुलगा आणि मुलीने वाटून घेतली आहेत; त्यामुळे सध्या मी गृहकर्तव्यदक्ष होण्याचे प्रशिक्षण घेत आहे. स्वयंपाकापासून ते झाडलोट, फरशी पुसणे, कपडे, भांडी घासणे अशी सगळी कामे मी सध्या करतोय. संध्याकाळी गच्चीवर ५० मिनिटे वॉक घेतो. स्वत:साठी वेळ देतो. स्वत:ला जाणून घेतो.
- स्वप्निल राजशेखर (अभिनेता)
नृत्याचे आॅनलाईन धडे
माझ्या रुटिनला एक शिस्त लावावी, ही इच्छा आता मी पूर्ण करीत आहे. पहाटे चारला उठते. योगा, प्राणायाम, मेडिटेशन, व्यायाम करते. सध्या नृत्याचा क्लास बंद असल्याने चहा-नाष्टा झाला क ी विद्यार्थिनींनी आॅनलाईन नृत्याचे धडे देते. परीक्षेच्या दृष्टीने त्यांची तयारी करून घेत आहे. मला स्वयंपाक बनवायलाही आवडतो; त्यामुळे रोज पदार्थांचे वेगवेगळे प्रयोग करते. चित्रकला शिकत आहे. शिवाय चित्रपट बघते, वाचन करते. आॅडिओ बुक्स ऐकते. अशा रीतीने दिवस सगळा आवडीच्या गोष्टी करण्यात घालविते.
- संयोगिता पाटील (भरतनाट्यम् नृत्यांगना)
सध्या पूर्ण वेळ घरात थांबावे लागत असल्याने जीवनशैली बदलली आहे. अनेक ठिकाणांहून आलेल्या ग्रंथांचे वाचन व त्यावरील लेखन सुरू आहे. कुटुंबातील कामाच्या मदतीचा नवा अनुभवही मिळत आहे. कुटुंबातील विविध विषयांवरील गप्पा, चर्चांनी कौटुंबिक स्नेहभाव वृद्धिंगत करण्याबरोबर विचार, भावना भागीदारीची वेगळी अनुभूती मिळत आहे. काही दुर्मीळ चित्रपट व कलावंतांच्या मुलाखतीही पाहत आहे. मित्रांशी फोनवरून संवाद होतो. या शांतताकाळात आपल्या मन:शक्तीला सकारात्मक आणि आपल्या आवडीच्या निर्माणकार्याला वेळ देण्याचे समाधान लाभत आहे.
प्रा. रणधीर शिंदे (साहित्यिक)