CoronaVirus Lockdown : बाजार समितीतील फळे-भाजीपाल्याची किरकोळ विक्री बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 07:39 PM2020-04-11T19:39:29+5:302020-04-11T19:57:25+5:30
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील किरकोळ फळे व भाजीपाला विक्री मार्केट रविवारपासून बंद करण्यात येत आहे. शेतीमालाच्या घाऊक सौद्यावेळी या विक्रेते व ग्राहकांमुळे गर्दी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील किरकोळ फळे व भाजीपाला विक्री मार्केट रविवारपासून बंद करण्यात येत आहे. शेतीमालाच्या घाऊक सौद्यावेळी या विक्रेते व ग्राहकांमुळे गर्दी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
‘कोरोना’चा संसर्ग होऊ नये, गर्दी टाळण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. मात्र भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची गर्दी रोखता येईना. बाजार समिती सौद्यात भाजीपाला व फळे घेऊन तिथेच विक्री केली जाते. सुमारे ५० हून अधिक व्यापारी किरकोळ विक्री करतात.
सौद्यातील शेतकरी, खरेदीदार, अडते, हमाल ही यंत्रणा असतानाच किरकोळ भाजीपाला खरेदीसाठी येणाऱ्यांची संख्याही मोठी असते. शनिवारी किरकोळ मार्केटमध्ये मोठी गर्दी झाली होती. हे पाहून पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी बाजार समितीला भेट दिली. सामाजिक अंतर ठेवूनच विक्री करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार समिती प्रशासनाने पुढील आदेशापर्यंत किरकोळ मार्केट बंद करण्याचा निर्णय घेतला.