CoronaVirus Lockdown : बोगस पासमुळे राधानगरीतील १८ नागरिकांना नाक्यावरच रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 02:55 PM2020-05-27T14:55:12+5:302020-05-27T14:58:26+5:30
ठाण्यापासून को्ल्हापुरात येईपर्यंत महामार्गावर चार ते पाच ठिकाणी पासची तपासणी करण्यात आली. मात्र, किणी नाक्यावर स्कॅन करताना हा पास बोगस असल्याचे कोल्हापूर पोलिसांनी सांगितल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.
कोल्हापूर : ठाणे पोलीस आयुक्तांचा पास घेऊन आलेल्या राधानगरी तालुक्यातील १८ नागरिकांना बोगस ई-पास असल्याचे सांगत किणी टोल नाक्यावरच रोखले.
गाडी मालकाने हा पास काढला होता. ठाण्यापासून को्ल्हापुरात येईपर्यंत महामार्गावर चार ते पाच ठिकाणी पासची तपासणी करण्यात आली. मात्र, किणी नाक्यावर स्कॅन करताना हा पास बोगस असल्याचे कोल्हापूर पोलिसांनी सांगितल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.
मुंबई, ठाणेसह परिसरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. गेली दोन महिने संपूर्ण देशातील जनजीवन विस्कळीत झाले असून सर्वाधिक फटका हा मुंबईसह शेजारील जिल्ह्यांना बसला आहे. त्यामुळे तेथील नागरिक आपल्या मूळ गावी जात असून कोल्हापुरातही मोठ्या प्रमाणात येत आहेत.
पहिल्या टप्प्यात हजारो नागरिक कोल्हापुरात आले. त्यातून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने मध्यंतरी चार-पाच दिवस प्रवेश बंद केले होते. सोमवारपासून पुन्हा प्रवेश सुरू झाल्याने नागरिकांनी ई-पास काढले होते.
राधानगरी तालुक्यातील आकनूर व अर्जुनवाडा येथील १८ जण दोन खासगी गाड्यांतून ठाण्यातून निघाले. प्रवास करणाऱ्या नागरिकांचा ई-पास संबंधित गाडी मालकाने ठाणे पोलीस आयुक्तांलयातून काढला होता. तो त्यांनी ठाण्यापासून कोल्हापूरपर्यंत चार ते पाच ठिकाणी दाखवून पुढील प्रवास केला. मात्र, मंगळवारी सकाळी किणी नाक्यावर आल्यानंतर तो पास ह्यस्कॅनह्ण करण्यात आला आणि पासच बोगस असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर नागरिकांची तारांबळ उडाली.
तुम्ही परत ठाण्याला जावा, असे पोलिसांनी सांगितल्याने संबंधितांनी गाडी मालकाशी बोलून घेतले. दिवसभर हे प्रवासी किणी नाक्यावरच थांबून होते. पास मिळविण्यासाठी त्यांनी निकराचे प्रयत्न केले. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्यात यश आले नाही.
राजकीय मंडळींचे प्रयत्न
पास बोगस असल्याचे पोलिसांनी सांगितल्यानंतर नागरिकांनी राजकीय मंडळींच्या मार्फत प्रयत्न सुरू केले. जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून ई-पासची खातरजमा केली गेली.
गाडी मालकाने पास काढला होता. वाटेत कोठेच अडवले नाही. किणी नाक्यावर आल्यानंतर बोगस असल्याचे सांगितल्याने हादरा बसला.
- प्रियांका पाटील (प्रवासी)