CoronaVirus Lockdown : व्हाईट आर्मी अन्नछत्रकडून कामगारांना जेवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 02:03 PM2020-04-04T14:03:41+5:302020-04-04T14:05:19+5:30
कोरोनामुळे सुरू असलेल्या संचारबंदीमुळे उपासमारीची वेळ आलेल्या कोल्हापुरातील कामगारांची भूक व्हाईट आर्मी अन्नछत्राच्या वतीने भागविली जात आहे. संस्थेतर्फे हनुमाननगर, रामनगर, शिये फाटा, नागाव फाटा, शिरोली एमआयडीसी, गोकुळ शिरगाव एमआयडीसी, तामगाव येथील अठराशेहून अधिक कामगारांना जेवण देण्यात येत आहे. हे अन्नछत्र चालविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोल्हापूर : कोरोनामुळे सुरू असलेल्या संचारबंदीमुळे उपासमारीची वेळ आलेल्या कोल्हापुरातील कामगारांची भूक व्हाईट आर्मी अन्नछत्राच्या वतीने भागविली जात आहे. संस्थेतर्फे हनुमाननगर, रामनगर, शिये फाटा, नागाव फाटा, शिरोली एमआयडीसी, गोकुळ शिरगाव एमआयडीसी, तामगाव येथील अठराशेहून अधिक कामगारांना जेवण देण्यात येत आहे. हे अन्नछत्र चालविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोनामुळे सध्या देशात लॉकडाऊन असल्याने हातावरचे पोट असलेल्या कामगारांवर संक्रांत आली आहे. काम बंद आहे. त्यातच हे कामगार आपल्या गावीही जाऊ शकत नाहीत, अशी दुहेरी अडचण आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ही बाब लक्षात येताच गजेंद्र प्रतिष्ठानचे अरविंद देशपांडे व कोल्हापूर महापालिकेच्या सहकार्यातून व्हाईट आर्मी संस्थेने अन्नछत्र उभारले आहे. याद्वारे या सर्व कामगारांना त्यांच्या राहत्या घरी व थांबलेल्या ठिकाणी जाऊन दोनवेळचे जेवण दिले जात आहे.
या काळात वाहनाची सोय नसल्याने अनेक कामगार मैलोन्मैलांचा प्रवास पायी करीत आपापल्या गावी परतत आहेत. अशा कामगारांना तसेच शिरोली ते कोगनोळी टोलनाका, संकल्प सिद्धी कार्यालयाशेजारी, जीवबा नाना जाधव पार्क, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर तसेच फुलेवाडी रिंग रोड ते रंकाळा परिसरात झोपड्या तयार करून राहत असलेल्या कुटुंबांनाही दोनवेळचे जेवण पुरविले जात आहे.
यासह जिल्हा आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित संशयित रुग्णांच्या नातेवाइकांसाठी जेवणाची सोय करण्यात आली आहे. अशा रीतीने आजवर अठराशेहून अधिक लोकांसाठी जेवणाची सोय करण्यात आली आहे.
अडकून पडलेल्या कामगारांना जेवण पुरविण्यासाठी व्हाईट आर्मीचे १०० महिला व पुरुष जवान सकाळपासून रात्रीपर्यंत राबत आहेत. अन्नछत्र चालविण्यासाठी धान्यस्वरूपात अथवा रोख स्वरूपात सहकार्याची गरज आहे, त्यासाठी दानशूरांनी पुढाकार घ्यावा. यासाठीचा निधी व्हाईट आर्मी रिलीफ फंड बॅँक आॅफ महाराष्ट्र खाते क्र. ६०३४१७७२०४१, आयएफसी कोड - एमएएचबी ०००११३० या खात्यावर जमा करावा.
- अशोक रोकडे,
अध्यक्ष, व्हाईट आर्मी