CoronaVirus Lockdown : सलून व्यावसायिकांचा आक्रमक पवित्रा, दसरा चौकात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 04:43 PM2020-06-12T16:43:15+5:302020-06-12T16:45:34+5:30
गेल्या अडीच महिन्यांपासून व्यवसाय बंद राहिल्याने सलून व्यावसायिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शुक्रवारी ऐतिहासिक दसरा चौकात जागर, मूक आंदोलन करीत शासनाचा निषेध केला. काळ्या फिती, काळे झेंडे आणि तोंडाला काळे मास्क लावून शेकडो सलून व्यावसायिक येथे जमा झाले. सोमवार (दि. १५) पासून दुकाने सुरू करण्याचा निर्धारही करण्यात आला.
कोल्हापूर : गेल्या अडीच महिन्यांपासून व्यवसाय बंद राहिल्याने सलून व्यावसायिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शुक्रवारी ऐतिहासिक दसरा चौकात जागर, मूक आंदोलन करीत शासनाचा निषेध केला. काळ्या फिती, काळे झेंडे आणि तोंडाला काळे मास्क लावून शेकडो सलून व्यावसायिक येथे जमा झाले. सोमवार (दि. १५) पासून दुकाने सुरू करण्याचा निर्धारही करण्यात आला.
केंद्र शासनाने सलून व्यावसायिकांना व्यवसाय करण्याची मुभा दिली आहे. तरीही राज्य शासनाने सलून व्यवसाय हा पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेतल्याने या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या सर्व घटकांवर आर्थिक संकट आले आहे. उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. नियम व अटींचे पालन करून व्यवसाय सुरू करू, अशी मागणी वारंवार करूनही जिल्हा प्रशासनाने सलून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली नसल्यामुळे सलून व्यावसायिकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, शुक्रवारी सकाळी १० वाजता दसरा चौक येथे शासनाविरोधात जागर व मूक आंदोलन केले. हातात काळे झेंडे, काळी फीत, काळे मास्क आणि काळे रुमाल दाखवीत त्यांनी शासनाचा निषेध केला.
जिल्ह्यातून शेकडो सलून व्यावसायिक एकत्र जमा झाल्याने पोलीस प्रशासनाने त्यांना घरी जाण्याचे आवाहन केले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी, शिवसेना शहरप्रमुख रवी इंगवले, अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंत मुळीक, नगरसेवक ईश्वर परमार, गुलाबराव घोरपडे हे आले.
याचबरोबर नाभिक समाजाचे विभागीय अध्यक्ष मारुती टिपुगडे, नाभिक समाज जिल्हाध्यक्ष सयाजी झुंजार, श्री संत शिरोमणी सेना महाराज नाभिक युवा संस्था आणि संस्थेचे अध्यक्ष मोहन चव्हाण, उपाध्यक्ष दीपक खराडे, सेक्रेटरी संदीप शिंदे, लक्ष्मण फुलपगारे, संभाजी संकपाळ, बाबासाहेब काशीद, राहुल टिपुगडे, सोमनाथ गवळी, गणेश जाधव, संतोष चव्हाण, सागर टिपुगडे, गणेश खेडकर, प्रमोद खेडकर, सचिन यादव यांच्यासह जिल्ह्यातील नाभिक समाजबांधव उपस्थित होते.