CoronaVirus Lockdown : एनडीआरएफच्या दोन तुकड्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडून मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 04:15 PM2020-05-16T16:15:09+5:302020-05-16T16:16:44+5:30
मागील वर्षी जिल्ह्यामधील महापूर परिस्थिती लक्षात घेऊन येत्या पावसाळ्यासाठी एनडीआरएफच्या दोन तुकड्या उपलब्ध व्हाव्यात, अशी मागणी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन महसूल आणि वन विभागाच्या सचिवांकडे केली.
कोल्हापूर : मागील वर्षी जिल्ह्यामधील महापूर परिस्थिती लक्षात घेऊन येत्या पावसाळ्यासाठी एनडीआरएफच्या दोन तुकड्या उपलब्ध व्हाव्यात, अशी मागणी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन महसूल आणि वन विभागाच्या सचिवांकडे केली.
जिल्हा प्रशासनाला एकाचवेळी कोरोनाची लढाई आणि संभाव्य महापूर लक्षात घेऊन त्यासाठीच्या उपाययोजना याचे नियोजन करावे लागत आहे.
गेल्या वर्षीच्या महापुराचा अनुभव लक्षात घेऊन यंदाच्या पावसाळ्यात दक्षता म्हणून १५ जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीसाठी एनडीआरएफच्या दोन तुकड्या जिल्ह्यासाठी द्याव्यात. या दोन्ही तुकड्यामध्ये प्रत्येकी २५ जवान ५ बोटीसह उपलब्ध करून देण्याची मागणी पत्रात करण्यात आली आहे. यातील एक तुकडी कोल्हापूर शहरासाठी तर दुसरी शिरोळसाठी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
महापूर आलेल्या गावांतील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी एनडीआरएफच्या जवानांची मोलाची मदत होते. शिवाय त्यांच्याकडे बोटीपासून अन्य अत्याधुनिक साधने असतात. त्याचा चांगला उपयोग होतो.
हे जवान उपलब्ध आहेत हीच बाब दिलासा देणारी असते. गतवर्षी या तुकड्या येण्यास विलंब झाला होता. त्यामुळे तसे होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी आतापासूनच त्याची मागणी केली आहे.