CoronaVirus Lockdown : जिल्ह्यात येण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 06:28 PM2020-05-16T18:28:12+5:302020-05-16T18:29:46+5:30
आपल्या नातेवाईकांना व इतर ग्रामस्थांना कोरोनाची लागण होऊ नये, याकरिता पुणे, मुंबईहून येणाऱ्या नागरिकांनी जिल्ह्यात येण्यापूर्वी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची परवानगी घ्यावी. हा निर्णय दक्षतेपोटी घेतला असून, त्यास सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी केले.
कोल्हापूर : आपल्या नातेवाईकांना व इतर ग्रामस्थांना कोरोनाची लागण होऊ नये, याकरिता पुणे, मुंबईहून येणाऱ्या नागरिकांनी जिल्ह्यात येण्यापूर्वी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची परवानगी घ्यावी. हा निर्णय दक्षतेपोटी घेतला असून, त्यास सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी केले.
गेल्या चार दिवसांत पुण्या-मुंबईहून कोल्हापुरात येणाऱ्या नागरिकांचा लोंढा सुरू आहे. त्यांच्यामुळे रुग्णांची संख्या वाढू लागल्याची भावना बळावू लागल्याने त्याला आवर घालण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे.
पालकमंत्री पाटील म्हणाले, गेले दोन महिने जिल्ह्यावासीयांचे आरोग्य व्यवस्थित ठेवण्याचे काम प्रशासनाने केले आहे. एक मे पासून जिल्ह्यात पाच हजार गाड्या मुंबई-पुणे येथून आल्या आहेत. वैद्यकीय पास घेऊन किमान १५ ते २० हजार व्यक्ती आल्या आहेत. या सर्वांचा स्राव तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
स्राव घेण्यासाठी दोन दिवस आणि तपासणी अहवाल येण्यासाठी दोन दिवस लागतात. यापूर्वीच्या व्यक्तींचा अहवाल येईपर्यंत काही दिवस आपण थांबावे आणि गरज असेल तर पुढील पाच सहा दिवसांनी यावे. जिल्ह्यात प्रादुर्भाव वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून संबंधित जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांच्याशी बोलून त्यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत.
जे नागरिक मुंबई, पुण्याहून येतील ते आप्त स्वकियांसह ग्रामस्थांना भेटणार आहेत. त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला. बाहेरून येणाऱ्यांनी प्रशासनाला समजून घ्यावे व सहकार्य करावे.
- सतेज पाटील
पालकमंत्री कोल्हापूर