CoronaVirus Lockdown : दुकाने सुरू करण्यावरून संभ्रम, काही ठिकाणची दुकाने सुरू, बहुतांश बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 04:19 PM2020-04-25T16:19:48+5:302020-04-25T16:22:02+5:30
दुकाने सुरू ठेवायची की बंद याबाबत शनिवारी दिवसभर संभ्रमावस्था निर्माण झाली. एकीकडे केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने शुक्रवारी (दि. २४) रात्री उशिरा काही अटींवर दुकाने सुरू करण्यात येत असल्याचे जाहीर केले. दुसरीकडे, जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडून आदेश येत नाहीत तोपर्यंत दुकाने बंदच राहतील, अशी भूमिका घेतली. यामुळे काही ठिकाणी दुकाने सुरू, तर बहुतांश ठिकाणी बंद असे चित्र दिसून आले.
कोल्हापूर : दुकाने सुरू ठेवायची की बंद याबाबत शनिवारी दिवसभर संभ्रमावस्था निर्माण झाली. एकीकडे केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने शुक्रवारी (दि. २४) रात्री उशिरा काही अटींवर दुकाने सुरू करण्यात येत असल्याचे जाहीर केले. दुसरीकडे, जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडून आदेश येत नाहीत तोपर्यंत दुकाने बंदच राहतील, अशी भूमिका घेतली. यामुळे काही ठिकाणी दुकाने सुरू, तर बहुतांश ठिकाणी बंद असे चित्र दिसून आले.
केंद्रीय गृह मंत्रालयाने शुक्रवारी रात्री उशिरा एक आदेश जारी केला. त्यानुसार देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नोंदणीकृत असलेली सर्व दुकाने काही अटींवर सुरू करण्याची परवानगी दिली. मॉल्सवरील जीवनावश्यक वस्तू वगळता बंदी कायम ठेवली.
या आदेशानुसार महापालिका, नगरपालिका हद्दीतील सर्व दुकाने सुरू करता येणार होती. मात्र, दुपारी जिल्हा प्रशासनाने जोपर्यंत राज्य शासनाकडून आदेश येत नाही तोपर्यंत सर्व दुकाने बंदच राहतील, असे स्पष्ट केले. त्यामुळे सकाळच्या सत्रात सुरू केलेली दुकाने पुन्हा बंद करण्याची वेळ आली.
कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शहरी आणि ग्रामीण भागांत काही दुकाने, आस्थापना सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्याचे वृत्त प्रसारित झाले. मात्र, राज्य सरकार अशा प्रकारची अधिसूचना काढत नाही, तोपर्यंत संचारबंदीच्या काळात सुरू असलेले नियम तसेच राहतील. राज्य सरकारने अधिसूचना काढल्याशिवाय कोणीही अशा प्रकारच्या आस्थापना, दुकाने सुरू करू नयेत.
- दौलत देसाई,
जिल्हाधिकारी