Coronavirus Unlock : ३१ मे रोजीच्या आदेशान्वयेच लॉकडाऊन, जिल्हयात वेगळे आदेश नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 06:06 PM2020-06-12T18:06:15+5:302020-06-12T18:09:13+5:30
कोल्हापूर : शासनाच्या ३१ मे रोजीच्या आदेशाप्रमाणे जिल्हयात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरु आहे. यात कोणताही बदल केलेला नाही. तसेच लॉकडाऊन ...
कोल्हापूर: शासनाच्या ३१ मे रोजीच्या आदेशाप्रमाणे जिल्हयात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरु आहे. यात कोणताही बदल केलेला नाही. तसेच लॉकडाऊन कडक करण्याबाबत वेगळे आदेश दिले नसल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिली. आवश्यकतेनुसार मार्केट यार्डमध्ये मुंबई तसेच नवी मुंबई येथे जाऊन आलेल्या चालक आणि वाहकांच्या स्वॅब तपासणीचे नियोजन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शासनाकडील ३१ मे च्या आदेशाप्रमाणे लॉकडाऊन बंदी आदेशाची अंमलबजावणी सुरू आहे. या कालावधीत महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या नियमांप्रमाणे बंदी आदेशाचे पालन करणे सर्व नागरिकांना बंधनकारक आहे. जिल्ह्यामध्ये विशेषत: शहर परिसरामध्ये लॉकडाऊनच्या अंमलबजावणीबाबत संभ्रमता निर्माण झाली आहे. या बंदी आदेशाप्रमाणे रात्री 9 ते सकाळी 5 या कालावधीत लोकांच्या हालचाली त्याप्रमाणं वाहनांच्या हालचालींवर बंदी घालण्यात आलेली आहे.
अत्यावश्यक सेवा आणि इतर आस्थापना या सुद्धा लॉकडाऊनच्या कालावधीत आता सुरू आहेत, फक्त त्यांच्या कालावधीमध्ये मर्यादा घातलेल्या आहेत. काही ठिकाणी रेस्टॉरंट किंवा काही ठिकाणी खाद्यपदार्थांच्या गाड्या सुरू करण्याचा प्रयत्न होत आहे किंवा पार्सल सेवा जी द्यायची आहे. त्याच्या ऐवजी दुकाने उघडी ठेऊन लोकांना खाद्यपदार्थ देण्याचा काही प्रसंग घडण्याची शक्यता आहे, अशा काही तक्रारी येत आहेत.
३१ मे च्या आदेशाप्रमाणे तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आदेशाप्रमाणे जिल्हयात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरु असून यात कोणताही बदल केलेला नाही. तसेच लॉकडाऊन कडक करण्याबाबत वेगळे आदेश दिलेले नाहीत. जिल्हयातील सर्व नागरिकांनी या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी देसाई यांनी केले. ते पुढे म्हणाले, संपूर्ण देशामध्ये आरोग्य सेतू या अँड्राईड मोबाईल ॲपची अंमलबजावणी सुरु आहे.
अँड्राईड मोबाईल ॲप प्रत्येकाने आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करून घेणे आवश्यक आहे आणि या अँड्राईड मोबाईल ॲपच्या आरोग्य सेतू माध्यमातून जे विश्लेषण जिल्हा प्रशासनास प्राप्त होते, त्याप्रमाणे जिल्ह्यामधील विविध कोरोना पॉझिटिव्ह व कोरोना बाधित क्षेत्र आहेत, या ठिकाणी बंदीची अंमलबजावणी केली जाते.
याच अनुषंगाने मागील दोन दिवसांमध्ये जिल्ह्यामध्ये विशेषत: शहरांमधील काही ठिकाणी आणि ग्रामीण भागामधील काही ठिकाणे आहेत. ही ठिकाणे अंबर आणि पिंक या कॅटेगरीमध्ये विभागलेली आहेत. या ठिकाणी जास्ती लक्ष देणे आवश्यक आहे. या ठिकाणी ज्या व्यक्तींनी आपलं हे आरोग्य सेतू ॲप जे डाउनलोड केलेले आहे, या ॲपच्या माध्यमातून मोबाईलच्या विश्लेषणातून निष्पन्न होत आहे, पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा वावर फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. यात प्रामुख्याने मार्केट यार्ड परिसर, गुळ मार्केट तसेच लक्ष्मीपुरी हा परिसर त्याच्यामध्ये येत आहे.
त्यामुळे या परिसरात जी काही मालवाहतूक होत आहे. या मालवाहतूकीसाठी चालक आणि वाहक हे मुंबई किंवा पुणे यासारख्या ठिकाणी जातात. तेथे चालक अथवा तेथील पॉझिटिव्ह असणाऱ्या लोकांच्या मोबाईलवर डाऊनलोड केलेल्या ॲपमधून आपल्याला असे विश्लेषन मिळत आहे, की या भागात पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा जास्त वावर आहे. त्यामुळे जिल्हाप्रशासन आणि महानगरपालिकेने असा निर्णय घेतला आहे, की, या परिसरात जास्त सतर्कता बाळगायची आहे.
स्क्रिनींग चांगल्या पद्धतीने करायचे आहे, त्याचप्रमाणे मार्केट परिसरात सर्व चालक आणि वाहक यांचे स्क्रीनिंग करायचा आहे आणि आवश्यकता भासली तर त्यांचा स्वॅब तपासणी करण्याचे नियोजन केले आहे. नवी मुंबई मुंबईमध्ये जाऊन पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आले असतील तर त्यांच्यापासून प्रादुर्भाव होण्याची शक्यता अथवा झाला असेत तर ते आपल्याला शोधुन काढता येईल. त्यांना वेळीच अलगीकरणात ठेवता येईल.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी ३१ मेच्या बंदी आदेशाचे पालन करावे. अनावश्यक गर्दी होणार नाही. सामाजिक अंतर राखले जाईल. सर्वांनी मास्क वापरावेत तसेच सॅनिटायझर वापरावे, तसेच एकमेकाला एकमेकापासून सुरक्षित ठेवावे, असेही ते म्हणाले.