CoronaVirus Lockdown :परराज्यांतील कामगारांनी कोल्हापुरातच राहणे केले पसंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 04:45 PM2020-05-14T16:45:10+5:302020-05-14T16:48:28+5:30
कोरोना विषाणूमुळे बंद असलेले उद्योग पुन्हा सुरू झाल्याने रिकाम्या हातांना काम मिळाल्याने परराज्यांतील कामगार पुन्हा स्थिरावत आहेत. एकीकडे परराज्यांतील कामगार गावी जात असताना काही परराज्यांतील कामगारांनी या ठिकाणी राहण्याचा निर्णय घेतल्याचे पाहावयास मिळते.
प्रदीप शिंदे
कोल्हापूर : कोरोना विषाणूमुळे बंद असलेले उद्योग पुन्हा सुरू झाल्याने रिकाम्या हातांना काम मिळाल्याने परराज्यांतील कामगार पुन्हा स्थिरावत आहेत. एकीकडे परराज्यांतील कामगार गावी जात असताना काही परराज्यांतील कामगारांनी या ठिकाणी राहण्याचा निर्णय घेतल्याचे पाहावयास मिळते.
कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेऊन लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद ठेवण्यात आले होते. मात्र उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी मिळाल्याने पुन्हा कारखाने सुरू झाले आहेत. कामगारांना काम उपलब्ध होऊ लागले आहे.
लॉकडाऊनदरम्यान हाताशी काम नसल्यामुळे परराज्यांतील अनेक कामगार आपापल्या मूळ गावाकडे परत निघाले आहे. मात्र लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता देण्यात आली. त्यानुसार व्यापार आणि उद्योग-धंदे सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे बंद असलेले उद्योन आता नव्याने सुरू होऊ लागल्याने कामगारांना काम मिळू लागल्याने अनेकांंनी गावी जाण्याचा निर्णय बदलला आहे.
कोरोना तो सभी जगह है....
कोरोना सिर्फ महाराष्ट्र में है ऐसी बात नहीं... कोरोना तो सभी जगह है. गाँव जायेंगे तो वहां भी रहेगा, अशी बोलकी प्रतिक्रिया परराज्यांतील कामगारांनी व्यक्त केली. तसेच गावी जाऊन करायचे काय असा मुख्य प्रश्न त्यांच्यासमोर आहे. लॉकडाऊनमुळे बंद असलेले काम आता पुन्हा सुरू झाल्याने चार पैसे मिळत आहेत. त्यामुळे अशा संकटकाळातही काम करून चार पैसे मिळवून गावी पाठवू तर शकतो. त्यामुळे गावी जाण्याचा निर्णय आम्ही बदलला असल्याचे अनेक परराज्यांतील कामगारांनी सांगितले.
गावाकडे काम नाही म्हणून सात वर्षे पूर्वी कोल्हापुरात आलो आहे. कोल्हापूरची स्थिती चांगली असल्याने या ठिकाणी राहणे सुरक्षित वाटते. आता पुन्हा काम सुरू झाल्याने गावी जाण्याचा प्रश्नच येत नाही.
मिथुन शेख,
पुतीमरी, नदिया (राज्य प. बंगाल)
कोरोनाच्या भीतीमुळे गावी गेलो तर तिथे ही कोरोनाचा आहेच की, परत तिथे कोणतेही काम नसणार आणि कोरोनाचे संकट असे दुहेरी संकट डोक्यावर राहणार आहे. त्यापेक्षा या ठिकाणी काम उपलब्ध झाल्याने चार पैसे तरी घरी पाठवू शकतो.
- अजय कुमार,
जि. गया (राज्य बिहार)
कारखाने सुरू झाल्याने कामगारांना काम उपलब्ध झाले आहे. गावी जाऊन पुन्हा रोजगारांची प्रश्न असल्याने अनेकांनी गावी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या कारखान्यात परराज्यातील कामगार आहेत. यांच्या आरोग्य तपासणी केली आहे. यासह जेवण्याची व्यवस्था केली आहे. सोशल डिस्टन्सिंग ठेवून शिफ्टमध्ये काम सुरू आहे
उत्तम जाधव, उद्योजक