CoronaVirus Lockdown : ‘लॉकडाऊन’ची पकड सैल होतेय, आता सगळेच कंटाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 03:51 PM2020-04-25T15:51:15+5:302020-04-25T15:53:16+5:30
ले महिनाभर प्रशासनाला मदत करणाऱ्या शहरवासीयांना आता लॉकडाऊन संपण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. बाहेर जावे तर बंदी आणि घरात बसावे तर कमालीचा उष्मा अशा प्रतिकूल परिस्थितीमुळे शहरवासीयच नाहीत, तर बंदोबस्तावरील पोलीसदेखील कंटाळले असल्याने ‘लॉकडाऊन’वरील पकड सैल होत आहे.
कोल्हापूर : गेले महिनाभर प्रशासनाला मदत करणाऱ्या शहरवासीयांना आता लॉकडाऊन संपण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. बाहेर जावे तर बंदी आणि घरात बसावे तर कमालीचा उष्मा अशा प्रतिकूल परिस्थितीमुळे शहरवासीयच नाहीत, तर बंदोबस्तावरील पोलीसदेखील कंटाळले असल्याने ‘लॉकडाऊन’वरील पकड सैल होत आहे.
कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात सापडलेल्या दहापैकी तीन कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, सात रुग्णांची प्रकृती सुधारत आहे. या रुग्णांपासून होणारा संसर्ग रोखण्यात सीपीआर तसेच जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या सतरा अठरा दिवसांत जिल्ह्यात एकही नवा रुग्ण आढळलेला नाही.
जिल्ह्यातील परिस्थिती सुधारत असल्यामुळे सर्वच पातळीवर थोडी शिथिलता येऊ लागली आहे. घरात बसून शहरवासीय कंटाळले आहेत, तर चोवीस तास उन्हातान्हात बंदोबस्त करून पोलिसांचीही दमछाक होऊ लागली आहे. म्हणूनच ‘लॉकडाऊन’ची पकड सैल होताना पहायला मिळत आहे.
त्याचा परिणाम म्हणून खरेदीच्या निमित्ताने शहरातील गर्दीही हळूहळू वाढू लागली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर करुनही काहीजण नियम पाळण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. दुचाकीवरून एकानेच प्रवास करायचा आहे, तरीही दोघे बसून प्रवास करीत आहेत. चारचाकी वाहनातून फक्त दोघांनाच आणि तेही चालक बसल्यावर त्याच्या मागे दुसऱ्याने बसायचे आहे. पण हा सुध्दा नियम बासनात गुंडाळून ठेवला जात आहे.
किराणा मालाची दुकाने तसेच धान्याच्या, मिरच्यांच्या दुकानासमोर गर्दी वाढलेली असून, या ठिकाणी सामाजिक अंतर ठेवण्याचा नियम देखील पायदळी तुडविला जात आहे.
पुन्हा एकदा बाजारपेठेत हाच अनुभव आला. महापालिका प्रशासनाने गर्दी टाळण्याकरिता अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत. मात्र शहरवासीयांचा तसेच भाजी विक्रेते, दुकानदारांचा म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नाही. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत.
या दिवसात मोठ्या प्रमाणात धान्य खरेदी केली जाते. घरोघरी मिरची कांडप, चटणीची कामे केली जातात. यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन असल्यामुळे या नियमित कामांना ब्रेक लागला आहे. मात्र ही कामे करणेच आवश्यक असल्याने नागरिक मोठ्या संख्येने खरेदीला बाहेर पडत आहेत. प्रशासनाने सवलत दिली याचा अर्थ घालून दिलेले नियम पायदळी तुडवावेत, असे नाही तर ते अधिक जागरुकपणे पाळणे आवश्यक आहे.