CoronaVirus Lockdown : दुकाने सुरू ठेवण्याची वेळ रात्री आठपर्यंत वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 03:59 PM2020-05-29T15:59:19+5:302020-05-29T16:00:59+5:30
कोल्हापूर : शहरातील व्यापार, व्यवसाय सुरू ठेवण्याची सध्याची सकाळी नऊ ते सायंकाळी पाच ही वेळ ग्राहक, व्यापारी आणि ...
कोल्हापूर : शहरातील व्यापार, व्यवसाय सुरू ठेवण्याची सध्याची सकाळी नऊ ते सायंकाळी पाच ही वेळ ग्राहक, व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी गैरसोयीची ठरणारी आहे. त्यामुळे या वेळेत रात्री आठपर्यंत वाढ करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा आणि महानगरपालिका प्रशासनाकडे कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्यावतीने करण्यात आली आहे.
लॉकडाऊनमुळे शहरातील विविध दुकाने, व्यापार, व्यवसाय हे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत सुरू ठेवण्यास महानगरपालिकेने परवानगी दिली आहे. त्यानुसार महाद्वार रोड, जोतिबा रोड, राजारामपुरी, शाहूपुरी, स्टेशन रोड, मध्यवर्ती बसस्थानक, राजाराम रोड, रेल्वे फाटक ते राजारामपुरी मार्ग, आदी परिसरातील शंभर टक्के दुकाने सुरू आहेत. पण, उन्हाचा तडाखा वाढत असल्याने दुपारी एकनंतर बहुतांश ग्राहक हे घरातून बाहेर पडत नाहीत.
उन्हाची तीव्रता कमी झाल्यानंतर ते खरेदीसाठी बाजारपेठेत येत आहेत. तोपर्यंत दुकाने बंद करण्याची वेळ होते. त्याचा फटका व्यापार, व्यवसायाला बसत असून, उलाढालीचे प्रमाण ५० टक्क्यांवर आले आहे. त्यामुळे दुकाने सुरू करण्याच्या वेळेत बदल करण्याची मागणी व्यापारी, व्यावसायिकांकडून कोल्हापूर चेंबरकडे झाली.
ग्राहकांच्या सोयीसह व्यापार, व्यवसायाच्या चक्राला गती देण्यासाठी दुकाने सुरू ठेवण्याच्या वेळेत बदल करण्यात यावा. ही वेळ सकाळी दहा ते रात्री आठ अशी करावी, अथवा दुकाने सुरू ठेवण्याचा कालावधी निश्चित करण्याचा अधिकार आम्हाला द्यावा, अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कल्लशेट्टी यांच्याकडे केली असल्याचे कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी शुक्रवारी सांगितले.