CoronaVirus Lockdown : कोरोनाचे संकट दूर होऊ दे... ईदला मुस्लिम बांधवांनी केली दुवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 05:18 PM2020-05-25T17:18:09+5:302020-05-25T17:21:09+5:30
जगावर आलेले कोरोनाचे संकट दूर होऊ दे, या विषाणूवर लवकरात लवकर औषधे यावीत, कोरोनाग्रस्त रुग्ण बरे व्हावेत, अशी दुवा करत सोमवारी मुस्लिम बांधवांनी रमजान ईद साजरी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच मुस्लिम बांधवांनी घरातच नमाज पठण करत शासनाच्या निर्देशाचे पालन केले. संकट असले तरी ईदच्या सोहळ्यातील उत्साह तसूभरही कमी झाला नाही.
कोल्हापूर : जगावर आलेले कोरोनाचे संकट दूर होऊ दे, या विषाणूवर लवकरात लवकर औषधे यावीत, कोरोनाग्रस्त रुग्ण बरे व्हावेत, अशी दुवा करत सोमवारी मुस्लिम बांधवांनी रमजान ईद साजरी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच मुस्लिम बांधवांनी घरातच नमाज पठण करत शासनाच्या निर्देशाचे पालन केले. संकट असले तरी ईदच्या सोहळ्यातील उत्साह तसूभरही कमी झाला नाही.
मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा सर्वात मोठा सण असतो. महिनाभर कडक उपवास केल्यानंतर यादिवशी उपवास सोडले जातात. ईदच्या दिवशी शहरातील विविध मस्जिदमध्ये सामूहिक नमाज पठण केले जाते. समाजबांधवांसह अन्य धर्मिय मित्र परिवारालाही यादिवशी शीरखुर्मा पिण्यासाठी आमंत्रित केले जाते.
यंदा मात्र कोरोनाने या सणाचा आनंदही हिरावून घेतला. सामूहिक संसर्ग टाळण्यासाठी शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करत मुस्लिम बांधवांनी आपल्या घरातच नमाज पठण केले. दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंगच्या मैदानावर केवळ चारजणांनी नमाज पठण केले.
मुफ्ती इर्शाद कुन्नुरे यांनी खुदबा व नमाज पठण केले. यावेळी त्यांनी जगभरातून कोरोना नष्ट होऊ दे, या आजारावर लवकर औषध मिळू दे, कोरोना झालेले नागरिक लवकर या आजारातून बरे होऊ देत, तसेच विश्वशांतीसाठी प्रार्थना केली.
यावेळी बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी उपस्थित होते. दरम्यान, शाहू छत्रपती, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, ॲड. गुलाबराव घोरपडे यांनी दूरध्वनीवरून ईदच्या शुभेच्छा दिल्या. दरवर्षी बोर्डिंगमध्ये शीरखुर्मा बनविला जातो; यंदा मात्र हा बेत टाळण्यात आला.
घराघरात अत्यंत साधेपणाने सण साजरा करण्यात आला. लहान मुलांमध्ये सणाचा उत्साह होता. यासह शहरातील कसाब मस्जिद, बडी मस्जिद, बागल चौक कब्रस्तान, निहाल पैलवान, घुडणपीर, बाबूजमाल, सदर बझार, शाहूपुरी थोरली मस्जिद, नंगीवली, लाईन बझार, बावडा यासह शहरातील विविध मस्जिदमध्ये मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत नमाज पठण करण्यात आले.