CoronaVirus Lockdown : बाजार समितीत कोथंबीर झाली उदंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 02:07 PM2020-04-06T14:07:45+5:302020-04-06T14:10:26+5:30
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी कोथंबीरची आवक वाढल्याने दरात घसरण झाली. तब्बल २१,५०० पेंढ्यांची आवक झाली. ‘लॉकडाऊन’मुळे उठाव नसल्याने सरासरी दर तीन रुपये पेंढीपर्यंत खाली आला.
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी कोथंबीरची आवक वाढल्याने दरात घसरण झाली. तब्बल २१,५०० पेंढ्यांची आवक झाली. ‘लॉकडाऊन’मुळे उठाव नसल्याने सरासरी दर तीन रुपये पेंढीपर्यंत खाली आला.
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर गेली बारा दिवस ‘लॉकडाऊन’ आहे. त्याचा परिणाम जनजीवनावर झाला असून, शेतीमाल शिवारातच पडून राहिला आहे. शेतीमाल तोडून आणायचा तर विकायचा कोठे? असा पेच शेतकऱ्यांसमोर आहे. बाजार समितीत शेतीमालाची आवक पूर्वीपेक्षा कितीतरी कमी असली तरी मागणीच नाही.
रविवारी. बाजार समितीत २१,५०० कोथंबीर पेढ्यांची आवक झाली. मात्र, उठाव न झाल्याने दर कोसळला. किमान एक रुपया तर कमाल पाच रुपये दर राहिला. टोमॅटोचीही आवक वाढल्याने दरात घसरण झाली. बाजार समितीत १३६९ कॅरेट आवक झाली. सरासरी साडेसात रुपये दर राहिला.
पोकळा, मेथी कडाडली
पोकळा, मेथीची आवक मर्यादित असल्याने दर तेजीत आहेत. घाऊक बाजारात मेथीची पेंढी बारा तर पोकळा अकरा रुपये दर राहिला.
कलिंगडची आवक वाढली
फळ मार्केटमध्ये संत्री, द्राक्षे, चिक्कू, सफरचंद व कलिंगडची आवक होती. इतर फळांच्या तुलनेत कलिंगडाची आवक थोडी जादा होती. काळ्या पाटीची लाल भडक कलिंगडे वीस रुपयाला मिळत होती.