CoronaVirus Lockdown :राजस्थान अथवा बिहारसाठी उद्या कोणतीही रेल्वे कोल्हापुरातून निघणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 11:01 AM2020-05-08T11:01:08+5:302020-05-08T11:02:25+5:30
राजस्थान तसेच बिहार वा कोणत्याही अन्य जिल्ह्यांसाठी शुक्रवारी कोल्हापुरातून कोणतीही रेल्वे निघणार नाही. समाज माध्यमांवरुन फिरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले.
कोल्हापूर - राजस्थान तसेच बिहार वा कोणत्याही अन्य जिल्ह्यांसाठी शुक्रवारी कोल्हापुरातून कोणतीही रेल्वे निघणार नाही. समाज माध्यमांवरुन फिरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले.
जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडाऊनमध्ये कोल्हापुरात अडकलेल्या इतर राज्यातील तसेच इतर जिल्ह्यातील कामगार, प्रवासी यांचे अर्ज जिल्हा प्रशासनाकडे आले आहेत. काही समाज माध्यमातून राजस्थान किंवा इतर राज्यामध्ये जाण्यासाठी रेल्वे सोडण्यात येणार आहे, असा संदेश फिरत आहे. परंतु, राजस्थान किंवा बिहारसाठी कुठलीही रेल्वे कोल्हापुरातून शुक्रवारी सुटणार नाही.
ज्यावेळी रेल्वे प्रशासन आणि संबंधित राज्यातील प्रशासनाची संमती मिळेल त्याचवेळी कोल्हापूर किंवा इतर ठिकाणाहून कामगारांची किंवा प्रवासी यांची रेल्वेतून वाहतूक त्या-त्या जिल्ह्यात केली जाईल.
कोणत्या दिवशी किती वाजता रेल्वे जाणार आहे, याविषयी जिल्हा प्रशासनामार्फत अधिकृत जाहीर केले जाईल. तोपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून या जिल्ह्यातील अडकलेल्या कामगार, प्रवासी यांची माहिती त्या-त्या राज्यातील संबंधित जिल्हा प्रशासनाकडे संमतीसाठी पाठविली आहे.
दोन दिवसात ही संमती येईल. यानंतर रेल्वे, बस तसेच खासगी वाहने यामधून अडकलेल्यांना प्रवासासाठी परवानगी दिली जाईल. त्यामुळे रेल्वे, स्थानक, बस स्थानक तसेच इतर ठिकाणी विनाकारण गर्दी करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करु नये, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले आहे.