CoronaVirus Lockdown : जिल्ह्यातील सव्वा लाख जणांना तीन महिन्यांची पेन्शन मिळणार एकदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 03:18 PM2020-04-25T15:18:44+5:302020-04-25T15:21:31+5:30
श्रावणबाळ निवृत्तिवेतन, संजय गांधी निराधार अनुदान योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तिवेतन, आदींसह विविध योजनांची एप्रिल, मे व जून महिन्यांची पेन्शन व अर्थसाहाय्याची रक्कम एकाच वेळी जमा करण्याचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने घेतला आहे. याचा लाभ जिल्ह्यातील एक लाख ३० हजार ८ जणांना होणार आहे. ही रक्कम या महिन्यातच जिल्हा प्रशासनाकडून जमा करण्यात येणार आहे.
प्रवीण देसाई
कोल्हापूर : श्रावणबाळ निवृत्तिवेतन, संजय गांधी निराधार अनुदान योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तिवेतन, आदींसह विविध योजनांची एप्रिल, मे व जून महिन्यांची पेन्शन व अर्थसाहाय्याची रक्कम एकाच वेळी जमा करण्याचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने घेतला आहे. याचा लाभ जिल्ह्यातील एक लाख ३० हजार ८ जणांना होणार आहे. ही रक्कम या महिन्यातच जिल्हा प्रशासनाकडून जमा करण्यात येणार आहे.
कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करता, केंद्र सरकारने इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तिवेतन योजना तसेच राज्य सरकारने संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेतील लाभार्थ्यांना एप्रिल, मे व जून महिन्यांतील अर्थसाहाय्य व पेन्शन एकत्रित जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
ही रक्कम महिनाअखेर जमा होणार आहे. याचा जिल्ह्यातील विविध योजनांच्या एक लाख ३० हजार ८ जणांना लाभ होणार आहे. नियमित अर्थसाहाय्य व पेन्शनसोबतच केंद्र सरकारने केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांसाठी नियमित पेन्शनव्यतिरिक्त ५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एप्रिल व मे या दोन्ही महिन्यांचे प्रत्येकी ५०० रुपये अनुदान हे मे महिन्यात देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
केंद्र व राज्य सरकारच्या आदेशांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष साहाय्य योजनेचे उपसचिव एस. जी. पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला पत्राद्वारे दिले आहेत.
लाभार्थ्यांना मिळणारी पेन्शन अशी
केंद्र सरकारपुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तिवेतन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ८०० ते १००० रुपयांपर्यंत पेन्शन मिळते; तर राज्य सरकारपुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेतील लाभार्थ्यांना १००० ते १२०० रुपयांची पेन्शन दिली जाते.
सरकारने तीन महिन्यांची पेन्शन लाभार्थ्यांना एकदम देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे; परंतु ही रक्कम पोस्टामार्फत थेट लाभार्थ्यांच्या घरी पोहोच करावी. केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारनेही सानुग्रह अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करावे.
- किशोर घाटगे,
अध्यक्ष, कोल्हापूर उत्तर संजय गांधी निराधार योजना समिती