CoronaVirus Lockdown : क्वारंटाईन शिक्का असूनही फिरणाऱ्यास पोलिसी खाक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 04:30 PM2020-05-20T16:30:24+5:302020-05-20T16:32:41+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होम क्वारंटाईन शिक्का मारलेला युवक शहरातील वांगी बोळसारख्या गजबजलेल्या क्षेत्रात फिरत होता. ही बाब परिसरातील नागरिकांनी पोलिसांना कळविली. तत्काळ या युवकावर जुना राजवाडा पोलिसांनी कारवाई करीत मंगळवारी रात्री त्याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला.
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होम क्वारंटाईन शिक्का मारलेला युवक शहरातील वांगी बोळसारख्या गजबजलेल्या क्षेत्रात फिरत होता. ही बाब परिसरातील नागरिकांनी पोलिसांना कळविली. तत्काळ या युवकावर जुना राजवाडा पोलिसांनी कारवाई करीत मंगळवारी रात्री त्याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला.
वांगी बोळ येथील युवक सोलापुरात कामानिमित्त गेला असता लॉकडाऊनमध्ये अडकला होता. तो काही दिवसांपूर्वी रीतसर परवानगी घेऊन कोल्हापुरात दाखल झाला. सोलापूरसारख्या कोरोनाच्या रेड झोनमधून आल्यामुळे दक्षतेचा उपाय म्हणून त्याच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला होता. मात्र, हा युवक घरात न राहता परिसरात फिरत होता.
ही बाब परिसरातील नागरिकांनी पोलिसांना कळविली. मंगळवारी रात्री त्याला जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्याच्यावर साथीचे रोग पसरविणे, संचारबंदीचा भंग करणे, आदी कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला.
जे नागरिक परजिल्ह्यांतून आले आहेत व त्यांना आरोग्य विभागाने होम क्वारंटाईन होण्याचा सल्ला दिला आहे, त्या नागरिकांनी घरीच राहावे; अन्यथा अशा नागरिकांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी दिला.