CoronaVirus Lockdown : कोल्हापुरात महिनाअखेरपासून चित्रीकरणाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 04:51 PM2020-05-09T16:51:29+5:302020-05-09T16:55:54+5:30
कोल्हापुरात महिनाअखेरपासून चॅनेल्सच्या मालिकांचे चित्रीकरण सुरू करण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. शुक्रवारी चित्रनगरीची पाहणी झाल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी परिसराची उर्वरित विकासकामे मार्गी लावण्याच्या सूचना करत १७ तारखेनंतर चित्रीकरणासाठीच्या सर्व मान्यता तातडीने मिळतील, असे आश्वासन दिले.
कोल्हापूर : कोल्हापुरात महिनाअखेरपासून चॅनेल्सच्या मालिकांचे चित्रीकरण सुरू करण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. शुक्रवारी चित्रनगरीची पाहणी झाल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी परिसराची उर्वरित विकासकामे मार्गी लावण्याच्या सूचना करत १७ तारखेनंतर चित्रीकरणासाठीच्या सर्व मान्यता तातडीने मिळतील, असे आश्वासन दिले.
सगळीकडे कोरोनाचे संकट असताना कोल्हापूरची आता ह्यग्रीन झोनह्णच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. मुंबई-पुण्यातील चित्रीकरण पुढील तीन-चार महिने सुरू होणार नसल्याने रखडलेल्या मालिकांचे चित्रीकरण कोल्हापुरात करण्यासाठीचे प्रयत्न चित्रपट व्यावसायिकांनी सुरू केले असून पालकमंत्री सतेज पाटील यांनी यात पुढाकार घेतला आहे. याअंतर्गतच शुक्रवारी दुपारी त्यांनी चित्रनगरी परिसराची पाहणी केली.
यावेळी मंत्री पाटील म्हणाले, १७ तारखेनंतर ग्रीन व ऑरेंज झोनमधील सर्व व्यवहार सुरू होणार आहेत. त्यामुळे चित्रीकरण सुरू करण्यास हरकत येणार नाही. चित्रीकरणासाठी शासकीय पातळीवर कोणकोणत्या विभागांच्या मान्यता घ्याव्या लागतात याची यादी द्या, या सर्व परवानग्या तातडीने मिळण्यासाठी विशेष व्यक्तीची नियुक्ती करून त्या तातडीने देण्याची व्यवस्था करू. चॅनेल हेड व निर्मात्यांच्याशी पुढील आठवड्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोल्हापुरात चित्रीकरण करण्यासाठी संवाद साधला जाईल.
यावेळी कलाकारांनी जयप्रभा स्टुडिओ, शालिनी सिनेटोनसारखे लोकेशन्स चित्रीकरणासाठी मिळावीत, अशी मागणी केली. यावेळी आर्किटेक्ट इंद्रजित नागेशकर, प्रकल्प अधिकारी दिलीप भांदिगरे, अभिनेता आनंद काळे, स्वप्निल राजशेखर, देवेंद्र चौगले, विकास पाटील, रवी गावडे, मिलिंद अष्टेकर, संगीतकार शशांक पोवार यांच्यासह चित्रपट व्यावसायिक उपस्थित होते.
चित्रनगरीचे काम मार्गी लावा
यावेळी मंत्री पाटील यांनी चित्रनगरीचे काम तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. आर्किटेक्ट इंद्रजित नागेशकर यांनी त्यांना दुसऱ्या टप्प्यात २ कोटींचा निधी मिळाला असून त्यातून तीन फ्लोअर करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावर पाटील यांनी स्टुडिओतील किरकोळ दुरूस्त्या, फर्निशिंग स्वच्छतागृह, परिसराची स्वच्छता यांची विशेष घेण्याची सूचना केली. कलाकार व टीमला समजण्यासाठी हायवेसह चित्रनगरीला जोडणाऱ्या रस्त्यांवर डिजीटल बोर्ड लावण्यात येणार आहेत.
वाहिन्यांकडून चौकशी
कोल्हापुरात चित्रीकरण सुरू होणार याची बातमी कळताच मुंबईतील विविध चॅनेल्स, निर्माते व प्रॉडक्शन कंपन्यांनी चौकशी सुरू केली आहे. याबाबत चौकशी करणारे दूरध्वनी चित्रनगरी व्यवस्थापनाला व चित्रपट व्यावसायिकांना येत आहेत. त्यामुळे येथील चित्रीकरणाची उपलब्ध साधने, चित्रीकरणाच्या टीमला देता येणाऱ्या सोयी-सुविधा या सगळ्यांची यादी बनवून रेडी टू शूटची तयारी करणयात येत आहे.