CoronaVirus Lockdown :आरोग्य कर्मचाऱ्याचा नोटांचा हार घालून सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 05:43 PM2020-04-03T17:43:24+5:302020-04-03T17:47:47+5:30
कोल्हापूर शहरावर कोरोनाचे संकट आलेले असताना महानगरपालिका प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा जोखीम पत्करून काम करीत आहे. संपूर्ण शहरातील नागरिक घरात ‘लॉकडाऊन’ असून महापालिकेचे कर्मचारी मात्र रस्त्यांवर येऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. त्याबद्दल कृतज्ञता म्हणून महालक्ष्मी व मंगेशकरनगर प्रभागातील नागरिकांनी घंटागाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा नोटांचा हार घालून आगळ्या वेगळ्या पध्दतीने गौरव केला.
कोल्हापूर : शहरावर कोरोनाचे संकट आलेले असताना महानगरपालिका प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा जोखीम पत्करून काम करीत आहे. संपूर्ण शहरातील नागरिक घरात ‘लॉकडाऊन’ असून महापालिकेचे कर्मचारी मात्र रस्त्यांवर येऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. त्याबद्दल कृतज्ञता म्हणून महालक्ष्मी व मंगेशकरनगर प्रभागातील नागरिकांनी घंटागाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा नोटांचा हार घालून आगळ्या वेगळ्या पध्दतीने गौरव केला.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि संचारबंदी असताना तसेच सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी जिवाची पर्वा न करता चोवीस तास काम करीत आहेत. यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान फार महत्त्वाचे आहे. यामुळे जनतेमध्ये त्यांच्याबद्दल आपुलकीची भावना निर्माण झाली आहे.
कर्मचाऱ्यांच्या योगदानाची दखल शुक्रवारी कोल्हापुरातील जनतेने घेतली. महालक्ष्मी व मंगेशकर नगर प्रभागातील घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांना शाल देऊन व पुष्पवृष्टी करून सन्मानित करण्यात आले.
प्रभाग क्रमांक ३३ महालक्ष्मी मंदिर येथील संघवी हॉस्पिटल गल्ली येथे दैनंदिन कचरा उठाव करणारे घंटागाडीवरील कर्मचारी मारुती घाटगे यांचा नागरिकांनी फुलांचा वर्षाव करून व शाल देऊन सत्कार केला. तर प्रभाग क्रमांक ४४ मंगेशकरनगर येथील दैनंदिन कचरा उठाव करणारे घंटागाडीवरील कर्मचारी रंगराव जयवंत आवळे यांचा तेथील नागरिकांनी फुलांचा वर्षाव करून व नोटांचा हार घालून सत्कार केला. नागरिकांकडून झालेल्या या अनोख्या सत्काराने कर्मचारी भारावून गेले.
.