CoronaVirus Lockdown : किरकोळ भाजीपाल्याच्या दरात घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 03:40 PM2020-04-25T15:40:39+5:302020-04-25T15:49:29+5:30
गेली पंधरा-वीस दिवस घाऊक बाजारापेक्षा दुप्पट दराने विक्री केली जाणाऱ्या भाजीपाल्याच्या दरात काहीशी घसरण झाली आहे. किलोमागे सरासरी ५ रुपये कमी झाले असून, ग्राहकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
कोल्हापूर : गेली पंधरा-वीस दिवस घाऊक बाजारापेक्षा दुप्पट दराने विक्री केली जाणाऱ्या भाजीपाल्याच्या दरात काहीशी घसरण झाली आहे. किलोमागे सरासरी ५ रुपये कमी झाले असून, ग्राहकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असून, त्यामुळे नागरिक घरातच आहेत. गेला महिनाभर हाताला काम नसल्याने जगायचे कसं? असा प्रश्न सामान्य माणसांसमोर आहे. त्यामुळे अनेकांचे हात मदतीसाठी पुढे येऊ लागले असताना भाजीपाल्या विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट सुरू आहे.
घाऊक बाजारातील भाज्यांचे दर आणि किरकोळ बाजारातील दरात मोठी तफावत दिसते. अडत (६ टक्के), हमाली, वाहतुकीचा खर्च धरून विक्रेत्यांने आपले मार्जिन किती घ्यायचे, यालाही एक मर्यादा असते. मात्र कोल्हापूर शहरातील विक्रेत्यांकडून जादा मार्जिन ठेवल्याने ग्राहकांची लूट सुरू होती.
याबाबत ‘लोकमत’ने ‘शेतकरी कंगाल, विक्रेते मालामाल’ हा ग्राऊंड रिपोर्ट प्रसिध्द केला होता. त्या दिवसापासून कोल्हापूर शहरातील किरकोळ विक्रेत्यांकडील भाज्यांच्या दरात घसरण झाली असून, किलोमागे सरासरी ५ रुपये कमी झाल्याचे ग्राहकांनीच सांगितले.
शुक्रवारी घाऊक व किरकोळ बाजारातील भाजीचे प्रतिकिलोचे दर-
भाजी घाऊक किरकोळ
वांगी २५ ४०
ढब्बू १५ ३०
भेंडी ३० ४०
टोमॅटो १० १५
गवारी २५ ४०
कांदा ९ १६
मेथी १५ (पेंढी) २०
कोथंबीर १३ २०
शेपू ८ १०
लॉकडाऊनच्या काळात जाणीवपूर्वक भाजीची टंचाई भासवत चढ्या दराने विक्री सुरू होती. ‘लोकमत’ने या लूटीवर प्रकाश टाकला आणि दोन दिवसापासून किरकोळ बाजारातील भाज्यांच्या दरात घसरण झाली.
-गिरीजा सूर्यवंशी,
ग्राहक, उत्तरेश्वर पेठ
भाज्यांच्या दरात एकदमच वाढ झाल्याने आमचे बजेट कोलमडले. विशेष म्हणजे शेतकऱ्यांकडून कमी दराने घ्यायचे आणि आम्हाला चढ्या दराने विकले जाते. दोन्ही घटकांची लूट सुरू असल्याबद्दल ‘लोकमत’ने वृत्त दिल्यानंतर काहीसे दर कमी झाले, ‘लोकमत’चे आभार.
- दीपाली प्रभू ,
गृहिणी, शिवाजी पेठ