CoronaVirus Lockdown : पुणे-मुंबईकरांबद्दलची लोकमतने मांडलेली भूमिका सामंजस्याची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 07:25 PM2020-05-22T19:25:56+5:302020-05-22T19:30:03+5:30
कोरोनाकाळात कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या पुण्या-मुंबईतील लोकांबद्दल लोकमतने घेतलेली भूमिका समंजसपणाची आहे, अशी प्रतिक्रिया समाजाच्या विविध स्तरांवर गेले दोन दिवस व्यक्त झाली. ही बातमी कोल्हापूरसह पुणे-मुंबईतीलही लोकांच्या शेकडो ग्रुपवर सोशल मीडियातून प्रसारित झाली.
कोल्हापूर : कोरोनाकाळात कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या पुण्या-मुंबईतील लोकांबद्दल लोकमतने घेतलेली भूमिका समंजसपणाची आहे, अशी प्रतिक्रिया समाजाच्या विविध स्तरांवर गेले दोन दिवस व्यक्त झाली. ही बातमी कोल्हापूरसह पुणे-मुंबईतीलही लोकांच्या शेकडो ग्रुपवर सोशल मीडियातून प्रसारित झाली.
रेड झोनमधून आलेल्या लोकांकडून स्थानिक लोकांना संसर्ग होऊ नये या काळजीपोटीच त्यांच्याबाबत गावपातळीवर आकसाची भूमिका घेतली जात आहे. या लोकांनीही पुरेशी दक्षता बाळगणे, हातावर शिक्का असतानाही गावांतून फिरणे बंद करावे, अशी अपेक्षा व्यक्त झाली. मुंबईकर लोकांनी महापुरात केलेल्या मदतीचे व्हिडीओ या बातमीसोबत अनेकांनी प्रसारित केले.
पुण्या-मुंबईतील माणूस तुमच्या कोणत्याही अडीअडचणीला धावून आला आहे; त्यामुळे त्याच्या ऋणातून उतराई होण्याची गावांना ही संधी आहे, या भावनेने या अडचणीकडे पाहिले पाहिजे. कोरोनाचे संकट आज ना उद्या दूर होईल किंवा त्याला सोबत घेऊनच जगावे लागेल. कोणत्याही अडचणीच्या काळात कोण कुणाशी कसे वागला, याची नोंद मनात फार खोलवर होते हे लक्षात घेऊन व्यवहार होण्याची गरज आहे.
आतापर्यंत शाहूवाडी, आजरा, भुदरगड, गडहिंग्लज, चंदगड, राधानगरी या तालुक्यांत रेड झोनमधून मोठ्या संख्येने लोक आले आहेत. आता येत्या मंगळवार (दि. २६)पासूनही थांबलेले लोक येणार आहेत. त्यामुळे हा प्रश्न नव्याने चर्चेत येणार आहे. तुम्ही आम्हांला हवे आहातच; पण कुटुंब, परिवार आणि आपला गाव कोरोनाच्या संसर्गापासून वाचला पाहिजे, यासाठीही तुमचीही जबाबदारी म्हणून काही दिवसांसाठी अंतर ठेवूया, आपलीच लहान मुले, वयोवृद्ध आईवडील घरोघरी आहेत. त्यांची काळजी घेऊया.
येणाऱ्या लोकांनी रीतसर परवानगी घेऊन तपासणी करून यावे. ग्रामस्थांनी त्यांचे संस्थात्मक किंवा घरी विलगीकरण करावे. त्यांनी गावाला समजून घ्यावे व गावाने त्यांना आधार द्यावा म्हणजे एकमेकांत संवादाचा पूल तयार होईल, अशी भावना व्यक्त झाली. गावे मतांसाठी, मदतीसाठी त्यांना इकडून गाड्या पाठवून आणतात आणि आता मात्र त्यांची दारात लागलेली गाडीही तुम्हांला का सहन होत नाही, असा प्रश्नही यानिमित्ताने पुढे आला आहे.
तुम्ही संकटात असता तेव्हा आपले लोक कसे वागतात हे जास्त महत्त्वाचे असते. गावांनी सामंजस्याची भूमिका घेण्यास प्रवृत्त करणारे लेखन झाले.
- शकील म्हालदार, बाळासाहेब फरास
गगनबावडा
मुंबईतील नागरिकांबाबत अशी स्पष्ट भूमिका घेणे आवश्यक होते. समाजाच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे काम या वृत्तामुळे झाले.
- डॉ. सतीश पत्की
प्रसिद्ध प्रसूतिशास्त्र तज्ज्ञ
मुंबईकर हे मूळचे कोल्हापूरकरच आहेत, ही भूमिका अत्यंत सामंजसपणाची व शहाणपणाची आहे. आपल्याच माणसांबद्दल निर्माण झालेली कटुता त्यामुळे कमी होण्यास मदत होईल.
- कौस्तुभ नाबर
जाहिरात व्यावसायिक