CoronaVirus Lockdown : साधे मास्क, ग्लोजवरच डॉक्टरांचा ‘कोरोना’ंशी लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 03:46 PM2020-03-30T15:46:13+5:302020-03-30T15:53:56+5:30
कोरोनाच्या लढाईत ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. साधे मास्क व ग्लोजवरच त्यांचा लढा सुरू आहे. मागणी करूनही पुरवठा होत नाही. बाजारात मोठ्या प्रमाणावर टंचाई असल्यानेच मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले.
कोल्हापूर : कोरोनाच्या लढाईत ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. साधे मास्क व ग्लोजवरच त्यांचा लढा सुरू आहे. मागणी करूनही पुरवठा होत नाही. बाजारात मोठ्या प्रमाणावर टंचाई असल्यानेच मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले.
जिल्ह्यात ७३ प्राथमिक आरोग्य केंद्र व ४१३ उपकेंद्रे आहेत. एका प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २0 ते २५ गावे आणि जवळपास ३0 हजार लोकसंख्या असते. एका आरोग्य केंद्राला दोन वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेवक, सेविका, ड्रायव्हर, परिचर असा जवळपास दहाजणांचा स्टाफ असतो.
सध्या कोरोनामुळे होम क्वारंटाईन होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. एकेका आरोग्य केंद्राकडे किमान २00 ते ३00 लोक होम क्वारंटाईनचे आहेत. त्यांची रोजची तपासणी व आढावा घेण्यासाठी डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना काम करावे लागते. मास्क आणि ग्लोज आले आहेत, पण खूपच हलक्या दर्जाचे आहेत.
मास्कसह अन्य साधनांची प्रचंड टंचाई आहे. शासनाकडून तातडीने येत नसल्याने जिल्हा परिषदेच्या पातळीवरच खरेदी केली जात आहे. साठा उपलब्ध होईल, तसा गरजेनुसार त्याचे वितरण केले जात आहे.
डॉ. योगेश साळे,
जिल्हा आरोग्य अधिकारी
पीपीकिट केवळ शंभरच उपलब्ध
शासनाच्या निकषानुसार प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये साधा तीन स्तर असलेला मास्क दिला जात आहे. त्याची संख्या पीएचसीनिहाय १५0 ते २00 इतकी आहे. ज्या रुग्णालयात कोरोनासदृश रुग्ण आहेत, अशा ठिकाणी वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी एन ९५ हा मास्क देण्यात आला आहे. ते मास्क केंद्रनिहाय २५ ते ५0 दिले आहेत. त्याची एकूण संख्या ५ हजार इतकी आहे. सध्या केवळ १00 पीपीकिट जिल्हा परिषदेकडे उपलब्ध आहेत. एकेका किटची किंमत ४00 ते ५00 आहे. प्रत्येक तालुक्याला १0 ते १५ किट देण्यासाठी म्हणून आणखी एक हजार किटची मागणी केली आहे.
बाह्यरुग्ण विभाग बंद
प्राथमिक आरोग्य केंद्रातील ओपीडी आता पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. फक्तक्वारंटाईन झालेल्या रुग्णांकडेच लक्ष दिले जात आहे. त्यामुळे इतर लहान मोठ्या आजारासाठी जायचे कुणाकडे, असा प्रश्न पीएचसीमध्ये उपचारासाठी जाणाऱ्या गोरगरिबांना पडला आहे.