CoronaVirus Lockdown : परप्रांतीय कामगारांना थांबवा; अन्यथा उद्योग बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 04:37 PM2020-05-14T16:37:31+5:302020-05-14T16:42:41+5:30
कोल्हापुरातील उद्योगांचे चक्र सुरू झाले असून काहीही करून गावी जाणाऱ्या परप्रांतीय कामगारांना थांबवा, अशी विनंती कोल्हापूर जिल्ह्यातील विविध नऊ औद्योगिक संघटनांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली.
कोल्हापूर : कोल्हापुरातील उद्योगांचे चक्र सुरू झाले असून काहीही करून गावी जाणाऱ्या परप्रांतीय कामगारांना थांबवा, अशी विनंती कोल्हापूर जिल्ह्यातील विविध नऊ औद्योगिक संघटनांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली.
आमदार चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली रणजित शहा, संजय शेटे, गोरख माळी, अतुल पाटील, मंगेश पाटील, प्रदीप व्हरांबळे यांनी निवेदन दिले. निवेदनावर सचिन शिरगावकर, सुुमित चौगुले यांच्याही सह्या आहेत.
लॉकडाऊननंतर गेल्या काही दिवसांत उद्योग सुरू झाले आहेत; परंतु विविध अडचणींमुळे ते पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाहीत. वाहतुकीची अडचण, कच्च्या मालाचा तुटवडा, महानगरे बंद असल्याने अडचणी येत आहेत.
लॉकडाऊनच्या काळात उद्योजकांनी परप्रांतीय कामगारांच्या राहण्याची, खाण्याची व्यवस्था केली. त्यांना कोणताही त्रास होऊ नये याची दक्षता घेतली. त्यांचा पगारही दिला आहे; परंतु शासनाने मोफत रेल्वेची सोय केल्याने परप्रांतीय मजूर गावी जात आहेत.
त्याचा फटका स्थानिक उद्योगांना बसणार आहे. त्यामुळे सुरू झालेले उद्योग बंद पडण्याची भीती आहे. त्यातून उर्वरित कामगारांनाही पगार देणे अशक्य होईल. यासाठी या मजुरांना थांबविणे आवश्यक आहे. त्यामुळे सुरू झालेले उद्योग तरी निदान नियमितपणे सुरू राहतील.
मजूर का गेले गावी...
१. महाराष्ट्रात कोरोना संसर्ग जास्त असल्याने कुटुंबीयांना वाटणारी भीती.
२. लॉकडाऊन वाढला तर पोटाला काय खायचे याची चिंता.
३. रेल्वेची मोफत सोय होत आहे तर गावी जाऊन येऊ ही भावना.