CoronaVirus Lockdown : कसबा बावड्यातील दोनशे श्रमिक बसने कर्नाटकात रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 03:29 PM2020-05-15T15:29:16+5:302020-05-15T15:31:09+5:30
हातावरती पोट असणारे कसबा बावडा येथील दोनशेहून अधिक रोजंदारी, खुदाई कामगारांचा समावेश असलेले श्रमिक परिवाराला त्यांच्या मूळ गावी कर्नाटकात शुक्रवारी सकाळी रवाना करण्यात आले. नगरसेवक डॉ. संदीप नेजदार यांनी त्यांच्यासाठी एस.टी.बसेसची व्यवस्था केली होती.
कोल्हापूर : हातावरती पोट असणारे कसबा बावडा येथील दोनशेहून अधिक रोजंदारी, खुदाई कामगारांचा समावेश असलेले श्रमिक परिवाराला त्यांच्या मूळ गावी कर्नाटकात शुक्रवारी सकाळी रवाना करण्यात आले. नगरसेवक डॉ. संदीप नेजदार यांनी त्यांच्यासाठी एस.टी.बसेसची व्यवस्था केली होती.
लॉकडाउनच्या काळात हाताला काम नसल्याने हातावरती पोट असणाऱ्या कसबा बावडा येथील दोनशेहून अधिक श्रमिक परिवाराची खाण्या-पिण्याची आबाळ झाली होती. रोजंदारी करणारे आणि खुदाई कामगारांचा यामध्ये समावेश होता. गेली कित्येक वर्षे ते त्यांच्या मूळ गावी म्हणजे कर्नाटकातील यादगीर, रायचूर, शिंदगी आणि विजापूर येथे गेले नव्हते.
लॉकडाउनमुळे या श्रमिकांना रोजगार मिळत नव्हते आणि लॉक डाउननंतर जीवन सुरळीत होईपर्र्यत गावी जाण्यासाठी या परिवाराने नगरसेवक डॉ. संदीप नेजदार यांच्याकडे मूळ गावी जाण्यासाठी मदत करण्याची मागणी केली होती.
यानुसार डॉ. संदीप नेजदार यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याशी चर्चा करुन या मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी परवानगी मिळविली. गेल्या आठ दिवसांपासून या सर्व श्रमिकांची प्रथमत: वैद्यकीय तपासणी करण्याची आणि या मजुरांची ई-पासची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी डॉ. संदीप नेजदार यांनी प्रयत्न केले. सुमारे दोनशे श्रमिकांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर आगाराकडे एसटी बसेसची मागणीही केली होती.
या पाठपुराव्यानंतर शुक्रवारी सकाळी जवळपास १५० पेक्षा अधिक मजुरांना कोल्हापूर आगारातून आलेल्या ९ एसटी बसेसच्या माध्यमातून त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आले. प्रत्येक बसमध्ये सुमारे १५ व्यक्तींना मास्क देउन बसविण्यात आले.
फिजिकल डिस्टन्स ठेवून आणि सॅनिटायझरचा वापर करुन एसटी कर्मचाऱ्यांनी या श्रमिकांना बसमध्ये बसविले. कर्नाटक राज्याच्या हद्दीपर्यंत कागवाड येथपर्यंत या बसेस या सर्वांना सोडून येणार आहेत. या श्रमिकांना त्यांच्या गावी पोहचविण्यासाठी विद्यार्थी काँग्रेसचे तुषार नेजदार, शुभम मुळ्ये, अनिकेत पाटील, रोहित कोंडेकर यांनी मदत केली.