CoronaVirus Lockdown : बिहारकडे दोन रेल्वे रवाना : दोन हजार ७३० प्रवाशी रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 06:16 PM2020-05-20T18:16:31+5:302020-05-20T18:17:55+5:30
भारत माता की जय ! छत्रपती शाहू महाराज की जय ! चा नारा देत कोल्हापूरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथून बुधवारी दोन श्रमिक विशेष रेल्वेने बिहारकडे दोन हजार ७३० कामगार रवाना झाले.
कोल्हापूर : भारत माता की जय ! छत्रपती शाहू महाराज की जय ! चा नारा देत कोल्हापूरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथून बुधवारी दोन श्रमिक विशेष रेल्वेने बिहारकडे दोन हजार ७३० कामगार रवाना झाले.
लोकमतचे संपादक वसंत भोसले, नवी दिल्ली आय एस टी ई चे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई, खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे, एस.एच. पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून बिहार येथील आररियाकडे रेल्वे मार्गस्थ झाली.
बिहार शासनाकडून मंजुरी आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने विविध तालुक्यांमधील मजुरांची यादी करुन रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून या कामगारांना व त्यांच्या कुटूंबियांना जाण्यासाठी नियोजन करण्यात आले.
एस.टी व केएमटी बसमधून मंजुरी मिळालेल्या कामगारांना छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे आणण्यात आले.याठिकाणी प्रवासाची रेल्वे तिकीटे त्यांना देण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावतीने जेवणाचे किट या मजुरांना देण्यात आले. त्यानंतर थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर याचा वापर करत त्यांना रेल्वेच्या बोगीमध्ये प्रवेश देण्यात आला.
शासनाने दिलेल्या सुविधा आणि गावी जाण्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. रेल्वे सुटताच प्रवाशांनीही टाळ्या वाजवून आणि घोषणा देवून आनंद व्यक्त केला.
बिहार येथील आररिया व बरौनीकडे रेल्वे रवाना झाली. यावेळी प्राचार्य डॉ. महादेव नरके, प्रा. राजेंद्र रायकर, हेमंत उलपे, पार्थ मुंडे, दीपक थोरात, शामराव कदम, सतीश आवटे आदी उपस्थित होते.