CoronaVirus Lockdown :दिव्यांगांची अशीही सेवा, विजय शिंदेची सामाजिक बांधीलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 05:17 PM2020-05-07T17:17:09+5:302020-05-07T17:17:43+5:30
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने सलग तिसऱ्यांदा लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे सर्वसामान्यांसह दिव्यांगांनाही केस कापणे, दाढी करणे या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ही बाब अोळखून एका खासगी बँकेत सुरक्षारक्षकाचे काम करणाऱ्या विजय शिंदे याने २३ दिव्यांगांचे घरी जाऊन मोफत केस, दाढी कर्तन केले आहेत.
कोल्हापूर : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने सलग तिसऱ्यांदा लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे सर्वसामान्यांसह दिव्यांगांनाही केस कापणे, दाढी करणे या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ही बाब अोळखून एका खासगी बँकेत सुरक्षारक्षकाचे काम करणाऱ्या विजय शिंदे याने २३ दिव्यांगांचे घरी जाऊन मोफत केस, दाढी कर्तन केले आहेत.
लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य लोकांना केशकर्तनासारख्या समस्येला सर्वाधिक सामोरे जावे लागले. केशकर्तन करणाऱ्यांकडून कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे केशकर्तनालये सुरू करण्यास सरकारने अद्यापही परवानगी दिलेली नाही. त्यामुळे सर्व सामान्यांपेक्षा अंध, दिव्यांगांचे मोठे हाल होत आहेत.
ही बाब जाणून एका खासगी बँकेत सायंकाळी सहा ते सकाळी सहा अशी बारा तासांची सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करणाऱ्या विजयने गरज ओळखून स्वत: मास्क, ग्लोज वापरून आणि सामाजिक अंतर राखत अशा २३ दिव्यांगांचे केस, दाढी कर्तन केले आहेत.
त्याला ही सेवा कायमस्वरूपी ठेवायची आहे. त्याने यापूर्वीही अशा दिव्यांगांना मोफतच दिली आहे. आपली एक सामाजिक जबाबदारी ओळखून काम करणाऱ्या विजयचे काम सर्वांना प्रेरणादायी ठरणारे आहे.
मी गेल्या दीड वर्षांपासून दिव्यांगबांधवांचे घरी जावून मोफत केस, दाढी, कटिंग करतो. या कामातून मला एक आत्मिक व त्यांची सेवाही केल्याचे समाधान मिळते.
-विजय शिंदे