CoronaVirus : ‘मरेल का हो हा विषाणू’, ‘परिवर्तन’ची लघुपटाची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 10:55 AM2020-04-22T10:55:17+5:302020-04-22T10:56:24+5:30
कोल्हापूर : कोरोनाच्या निमित्ताने पुन्हा डोकं वर काढत असलेल्या विशिष्ट धर्मद्वेषाचा विषाणू कधी मरणार, असा प्रश्न उपस्थित करत लघुपटाच्या ...
कोल्हापूर : कोरोनाच्या निमित्ताने पुन्हा डोकं वर काढत असलेल्या विशिष्ट धर्मद्वेषाचा विषाणू कधी मरणार, असा प्रश्न उपस्थित करत लघुपटाच्या माध्यमातून कोल्हापूरच्या तरुणाईने त्यावर प्रकाशझोत टाकला आहे.
‘मरेल का हो हा विषाणू,’असा प्रश्न उपस्थित करत परिवर्तन कला फौंडेशनने ‘विषाणू’ या लघुपटाची निर्मिती केली असून पहिल्याच दिवशी समाजमाध्यमांवर उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर त्याविरोधात लॉकडाऊनचे शस्त्र उगारण्यात आले. भारत धर्मनिरपेक्ष देश असून येथे सर्व जातिधर्माचे लोक गुण्या-गोविंदाने नांदत आहेत. मात्र, दिल्लीतील मरकज येथील घटनेनंतर देशातील नागरिकांमध्ये विशिष्ट धर्माच्या नागरिकांबद्दल तीव्र नाराजीचे वातावरण तयार झाले.
अनेक वर्षे एकमेकांचे सख्खे शेजारी, जबाबदार नागरिक म्हणून सगळ्यांनी एकमेकांना साथ दिली आहे. हे सलोख्याचे वातावरण एका घटनेने कलुषित झाले आणि सर्वसामान्य नागरिकांच्या चर्चेतून विरोधी मतांचा सूर ऐकू येऊ लागला.
या चर्चेमुळे अस्वस्थ झालेल्या परिवर्तन कला फौंडेशनच्या कलाकारांनी पाच मिनिटांच्या लघुपटाच्या माध्यमातून नागरिकांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचा प्रयत्न केला आहे.
कोरोनाचा विषाणू काही दिवसांत मरेलही पण धर्मद्वेषाचा विषाणू मरायला हवा, या परिस्थितीत सगळ्यांनी एकमेकांचे द्वेष करण्याऐवजी एकमेकांना सहकार्य करून पुढे जाण्याची गरज आहे, हा संदेश त्यांनी दिला आहे.
लघुपटाचे दिग्दर्शन किरणसिंह चव्हाण यांनी केले असून युवराज पाटील यांचे लेखन आहे. त्यात रितीकाराजे, रोनितराजे व अजित पाटील यांनी भूमिका निभावल्या आहेत. हा लघुपट मंगळवारी समाजमाध्यमांवर अपलोड करण्यात आला असून त्याला एका दिवसातच चांगला प्रतिसाद मिळाला आहे.