CoronaVirus News: कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र असेल तरच कोल्हापुरात या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 03:02 AM2021-04-07T03:02:44+5:302021-04-07T03:03:03+5:30
जिल्ह्यातील सध्याच्या कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये १५ टक्क्यांहून अधिक संख्या अन्य जिल्हयातून येणाऱ्या नागरिकांची आहे. यात मुंबई, पुणे, सांगली, सातारा येथील नागरिकांचा समावेश आहे.
कोल्हापूर : कोरोनाबाधित जिल्ह्यातून येत असलेल्या नागरिकांमुळे कोल्हापुरात संसर्गाचे प्रमाण वाढल्याने जिल्हा प्रशासनाने परगावहून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांसाठी आरटीपीसीआर अथवा ॲन्टीजेन टेस्ट नकारात्मक असल्याचे ४८ तासांच्या आतील प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी हा आदेश काढला.
जिल्ह्यातील सध्याच्या कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये १५ टक्क्यांहून अधिक संख्या अन्य जिल्हयातून येणाऱ्या नागरिकांची आहे. यात मुंबई, पुणे, सांगली, सातारा येथील नागरिकांचा समावेश आहे.
जिल्ह्यात तात्पुरत्या किंवा कायमस्वरुपी येणाऱ्या किंवा एका गावातून दुसऱ्या गावात जाणाऱ्या व्यक्तींनी जिल्ह्यात किंवा गावात प्रवेश करण्यापूर्वी ४८ तासात आरटीपीसीआर किंवा ॲन्टीजेन चाचणी केल्याचे व तपासणी अहवाल निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. प्रमाणपत्र नसल्यास प्रभाग समिती, ग्राम समिती किंवा अधिकारी-कर्मचारी यांच्याकडून या व्यक्तींना प्रवेश नाकारला जाईल.
प्रमाणपत्र नसल्यास स्वॅब द्या; सात दिवस राहावे लागणार विलगीकरणात
प्रमाणपत्र नसलेल्या व्यक्तींनी तालुक्यातील शासकीय किंवा खासगी
प्रयोगशाळेत आधी स्वॅब देणे बंधनकारक आहे. तपासणी अहवाल
नकारात्मक येईपर्यंत या नागरिकांना सात दिवस गृह किंवा संस्थात्मक
अलगीकरण केंद्रात राहावे लागेल.
तसेच तपासणी न करता परस्पर घरी गेल्यास सात दिवस गृह किंवा संस्थात्मक अलगीकरण केंद्रात राहावे लागेल, असेही आदेशात म्हटले आहे.