CoronaVirus : कोविडसाठी सलग सात दिवस सेवा देणाऱ्या खासगी डॉक्टरांना मानधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 04:01 PM2020-05-30T16:01:12+5:302020-05-30T16:03:34+5:30
कोविडच्या उच्चाटनासाठी खासगी डॉक्टरांनी सामाजिक बांधीलकी म्हणून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. सलग सात दिवस कर्तव्यावर असणाऱ्या खासगी पदवीधर डॉक्टरांना प्रतिदिन दोन हजार रुपये, तर उच्च पदवीधरांना तीन हजार रुपये मानधन देण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
कोल्हापूर : कोविडच्या उच्चाटनासाठी खासगी डॉक्टरांनी सामाजिक बांधीलकी म्हणून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. सलग सात दिवस कर्तव्यावर असणाऱ्या खासगी पदवीधर डॉक्टरांना प्रतिदिन दोन हजार रुपये, तर उच्च पदवीधरांना तीन हजार रुपये मानधन देण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यांनी खासगी डॉक्टरांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. कोरोनाच्या निर्मूलनासाठी सामाजिक बांधीलकी म्हणून खासगी डॉक्टरांनी ऐच्छिक सेवा बजावावी. जिल्हा प्रशासनाकडून त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल.
सलग सात दिवस कर्तव्यानंतर पुढील सात दिवस अलगीकरण अशा स्वरूपाचे नियोजन अपेक्षित आहे. अपवादात्मक प्रकरणात तीन ते चार दिवसांची सेवा स्वीकारली जाईल. विनामानधन सेवा देणाऱ्या डॉक्टरांचे स्वागतच असेल. तालुका आरोग्याधिकारी, जिल्हा आरोग्याधिकारी, उपजिल्हाधिकारी यांनी बजावलेल्या आदेशांचे जे डॉक्टर पालन करीत आहेत, त्यांना विमा कवच असेल. कर्तव्य बजावत असताना दुर्दैवाने अपघात घडल्यास त्यालाही विमा असेल.
डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची राहण्याची, जेवणाची व अलगीकरणासाठी व्यवस्था केली जाईल. त्याचबरोबर त्यांना सुरक्षा किटही दिले जाईल. कोविडसाठी कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टरांना जिल्हा प्रशासनामार्फत विशेष प्रमाणपत्रही दिले जाईल, असे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे, स्वीय साहाय्यक विज्ञान मुंडे उपस्थित होते.
शासकीय खर्चातून उपचार
कोणत्याही डॉक्टरला दुर्दैवाने लागण झाल्यास शासकीय खर्चातून त्यांच्यावर उपचार केले जातील. खासगी पॅरामेडिकल स्टाफ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, रुग्णवाहिका यांनी कोविडविरुद्धच्या युद्धात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी देसाई यांनी केले.