CoronaVirus : बेकायदेशीर यात्री निवास सील करा : अजित ठाणेकर यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 07:14 PM2020-05-28T19:14:32+5:302020-05-28T19:18:33+5:30
प्रशासनाची परवानगी न घेता परगावांहून आलेल्या लोकांना अनधिकृत यात्री निवासांमधून आसरा मिळू शकतो. त्यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने कोल्हापुरातील सर्व अनधिकृत, विनापरवाना यात्री निवास व लॉजिंग सील करावीत, अशी मागणी भाजपचे गटनेते अजित ठाणेकर यांनी गुरुवारी केली.
कोल्हापूर : प्रशासनाची परवानगी न घेता परगावांहून आलेल्या लोकांना अनधिकृत यात्री निवासांमधून आसरा मिळू शकतो. त्यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने कोल्हापुरातील सर्व अनधिकृत, विनापरवाना यात्री निवास व लॉजिंग सील करावीत, अशी मागणी भाजपचे गटनेते अजित ठाणेकर यांनी गुरुवारी केली.
ठाणेकर यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या अंबाबाई मंदिराच्या परिसरात तसेच शहरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर यात्री निवास, लॉजिंग आहेत.
यांतील काही यात्री निवासांमध्ये लॉकडाऊन काळात बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तींना अनधिकृतपणे ठेवून घेण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. तेथील जागरूक नागरिकांनी वेळीच हा प्रयत्न हाणून पाडला.
सध्या मोठ्या प्रमाणावर परगावांहून नागरिक कोल्हापुरात येत आहेत. प्रशासनाची परवानगी न घेता अनधिकृतपणे आलेल्या लोकांना या यात्री निवासांमधून आसरा मिळू शकतो आणि त्यातून पुढे कोरोना संक्रमणाचा धोका वाढू शकतो, हे लक्षात घेऊन अनधिकृत यात्री निवास व लॉजिंग तातडीने सील करावेत.
त्याचबरोबर संस्थात्मक अलगीकरणात जागा नसल्याने प्रशासन नागरिकांना शहरातील विविध हॉटेलमध्ये राहण्याचा सल्ला देत आहे. या हॉटेलचे भाडे सर्वसामान्यांना परवडणारे नाही. त्यामुळे त्यांना कमी खर्चात चांगल्या सोयी-सुविधा असलेले व धर्मादाय पद्धतीने चालविले गेलेले लॉजेस व यात्री निवास उपलब्ध करून देण्यात यावेत, अशीही मागणी त्यांनी केली आहे.