CoronaVirus : जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचा सामाजिक संसर्ग नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 06:49 PM2020-05-26T18:49:18+5:302020-05-26T18:52:44+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये सामाजिक संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय रेड झोनमधून जिल्ह्यामध्ये येणाऱ्यांचा स्वॅब घेण्याचे धोरण राबविले. त्यामुळे ...
कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये सामाजिक संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय रेड झोनमधून जिल्ह्यामध्ये येणाऱ्यांचा स्वॅब घेण्याचे धोरण राबविले. त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत सामाजिक संसर्ग नाही. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले.
आज दुपारपर्यंत जिल्ह्यामध्ये ३७८ कोरोना बाधित रूग्णांची संख्या आहे. यामध्ये पुणे, मुंबई, रायगड, ठाणे, सोलापूर या रेड झोनमधून आलेल्या व्यक्तींचा समावेश आहे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक एकही रूग्ण नाही.
तपासणी नाक्यांवरून कोव्हिड हॉस्पिटलमध्ये पाठवून स्वॅब घेतला जातो. त्यानंतर त्यांना अलगीकरण केले जाते. त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये. संख्या जरी वाढलेली असली तरी, बाधित कोण आहे हे आपल्याला माहिती आहे. त्यांना रूग्णालयात ठेवून उपचार केले जातात. हे रूग्ण आपण शोधलेले आहेत. यांच्यापासून इतरांना संसर्ग होऊ नये, याची आपण काळजी घेत आहोत.
उपचारानंतर बरे झालेल्या आजअखेर २१ जणांना घरी सोडण्यात आलेले आहे. पुढच्या १० दिवसात मोठ्या प्रमाणावर बरे झालेल्या रूग्णांना घरी सोडण्यात येईल. कोरोनाने बाधित होऊन मृत्यू झालेल्या रूग्णाची संख्या १ आहे. दुसरा तपासणी करण्यापूर्वी मृत्यू झाला आहे, त्यानंतर तो पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. हे २ मृत्यू जरी धरले तरी जिल्ह्यामध्ये मृत्यूचे प्रमाण कमी राखण्यात यशस्वी झालो आहोत.
ज्या रूग्णांना मधुमेह, मूत्रपिंड विकार, हृदयविकार, कर्करोगचा व्याधी आहे, अशा रूग्णांची विशेष काळजी घेतली जाते. अशा व्याधी असणाऱ्या कोरोना बाधितांना सी.पी.आर. आणि डॉ. डी.वाय.पाटील रूग्णालयात उपचार देण्याबाबत सर्वांना सूचना देण्यात आल्या आहेत, असेही ते म्हणाले.